अक्कलकोट : कर्नाटकातून अवैधरित्या वाळू आणून अक्कलकोट परिसरात विक्री करणाऱ्यांविरोधात दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १५ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता ही कारवाई झाली. या कारवाईत ७ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी आरोपी चालक वसीम मौलासाब चणेगाव (रा. मणूर, ता. अफझलपूर जिल्हा कलबुर्गी), मालक उमेश मलकप्पा भासगी (रा. मणूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या याबाबत पोलीस कर्मचारी अमोगसिद्ध वाघमोडे यांनी फिर्याद दिली असून प्रकरणात चालक वसीम चणेगाव याला पोलिसांनी अटक केली आहे.
सोलापूर जिल्ह्यात वाळूबंदी असताना कर्नाटक राज्यातून अवैधरित्या उपसा करून विक्रीस आणत असताना मैंदर्गी येथे पोलिसांनी पकडून कारवाई केली. या कारवाईत दीड ब्रास वाळू आणि विनानंबरचा टेम्पो असा ७ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास श्रीकांत चव्हाण करीत आहेत.