पहिल्या लाटेत अक्कलकोट तालुक्यात रुग्णांची संख्या कमी होती. दुस-या लाटेत रुग्ण संख्या वाढली मृत्यूसंख्या वाढत होती. त्यामुळे तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र, आरोग्य विभागातील अधिका-यांनी मोठ्या जिद्दीने आणि प्रयत्नाने परिस्थिती बदलण्याची जिद्द ठेवली. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या सहकार्याने तत्कालीन तहसीलदार अंजली मरोड, तालुका वैधकीय अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड व दोन्ही पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी मोठ्या धैर्याने सामोरे जात चोख नियोजन केले. अक्कलकोटमध्ये कोविड सेंटर सुरू झाल्यानंतर लोकही लक्षणे दिसल्यानंतर तपासणीसाठी पुढे येत राहिले. १५ जुलैनंतर तालुक्यात मृत्यू प्रमाण तर कमी झाले. रुग्ण संख्याही झपाट्याने कमी होत गेले. सध्या अक्कलकोटमधील कोविड सेंटरमध्ये एकही रुग्ण नाही. तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी डॉ. नीरज जाधव, निखिल क्षीरसागर, सतीश बिराजदार, सुभाष कांबळे, डॉ. गजानन मारकड, डॉ. शिवलीला माळी, साधना पाटील, मंजुनाथ पाटील, बसवनगौडा पाटील, विस्तार अधिकारी महेश भोरे यांचे योगदान राहिले आहे.
.............
कोरोनामुक्तीसाठी हे केले
प्रथमतः होम क्वारंटाईन बंद करण्यात आले. पॉझिटिव्ह आल्यास कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करणे, संशयित रुग्णांच्या टेस्टिंगवर भर देण्यात आले. २० वैद्यकीय अधिकारी, ३३३ कर्मचारी यांना गावे वाटून देऊन नियोजन केले. तालुक्यात उपचार होण्यासाठी ५०० लोकांचे कोविड केअर सेंटर सुरु केले. याशिवाय लसीकरणार भर देण्यात आले. आतापर्यंत १ लाख ३३ हजार जणांचे लसीकरण झाले आहे. अक्कलकोट शहरातील खासगी डॉक्टरांचे व्हाॅट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आले होते. त्यात संशयित व्यक्तीची माहिती आल्याने तपासणीला मदत झाली.
.............
शासनाच्या नियमांचे पालन करीत चोख नियोजन केले. नागरिकांकडून प्रतिसाद मिळाला. तपासणीला सहकार्य केले. कोविड सेंटरमध्ये चांगले उपचार मिळत असल्याने लोक स्वत:हून तपासणी पुढे येत होते. त्यामुळे तालुक्यातील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. आता कोविड सेंटरमध्ये एकही रुग्ण नाही.
- डॉ. अश्विन करजखेडे, तालुका आरोग्य अधिकारी
...................
सध्या अहवालात दोन चार रुग्ण दिसतात. वास्तविक पाहता ते सोलापुरात राहतात. त्यांचा पत्ता अक्कलकोटचा आहे. त्यामुळे ती संख्या अक्कलकोटमध्ये दिसते. त्यामुळे सध्या तालुक्यात एकही रुग्ण नाही. यापुढेही तपासणी सुरूच राहणार आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे.
- डॉ. अशोक राठोड, वैद्यकीय अधीक्षक