अक्कलकोट : तालुक्यात ७२ ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. मागील आठ दिवसांपासून वातावरण ढवळून निघत आहे. अक्कलकोट शहर, तहसील कार्यालय परिसराला यात्रेचे स्वरूप आले.
या सप्ताहात बहुतांश इच्छुकांची जातीचे प्रमाणपत्र आणि निवडणुकीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी धावपळ दिसून आली. शेतीवाडीतील कामधंदे सोडून हे लोक अक्कलकोट शहरात दिवसभर ठाण मांडून राहिले होते. ऑनलाइन अर्ज दाखल करत असताना काही ठिकाणी मनमानी झाली. यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते. निवडणूक आयोगाने लादलेल्या जाचक अटी व कागदपत्रांमुळे पुन्हा निवडणूक नको रे बाबा म्हणायची वेळ आली.
तहसीलदार कार्यालयासमोर गर्दी वाढत राहिली. अनेक गावे बिनविरोध होण्याची तयारी चालवली असताना अचानकपणे मधूनच एखादा इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी पुढे आला. काहींची शेवटपर्यंत मनधरणी करावी लागली.
तहसीलदार हे अक्कलकोट येथे प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत आहेत. जातीचे दाखले, पडताळणी आणि कार्यालयीन कामकाजात अनेक अडचणी उद्भवल्या. तहसील प्रशासनात निवडणूक विभाग आणि इतर विभागातील एकमेकांत ताळमेळ नव्हता. रात्री उशिरापर्यंत एकूण उमेदवारांचे दाखल अर्ज याबाबत माहिती संकलित होऊ शकलेली नव्हती.
फोटो :
अक्कलकोट तहसील कार्यालय परिसरात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांनी गर्दी केली होती.