शिवानंद फुलारी अक्कलकोट : सांगवी बु।। (ता. अक्कलकोट) येथील सेवानिवृत्त शिक्षक सोमेश्वर गुरव हे सेंद्रिय शेतीद्वारे गूळ निर्मिती करीत असून, हा सेंद्रिय गूळ अक्कलकोट येथील डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांच्या माध्यमातून शिवपुरी संस्थानकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. त्यांच्याच माध्यमातून डोंबिवली, खारघर, पुणे, मंगळवेढा, सोलापूर, बार्शीसह परदेशात आॅस्ट्रेलिया, जर्मन, इंग्लंड या देशात विकला जात आहे. तेथील बाजारपेठेत मोठी मागणी असून, प्रतिकिलो ८० रुपये दरही मिळत आहे. तालुक्यात विषमुक्त शेतीचा नवा पायंडा घालणाºया गुरव यांचा आदर्श इतर शेतकरी घेत आहेत.
सेवानिवृत्त शिक्षक गुरव यांनी अचलेर (ता. उमरगा) येथे तब्बल ३३ वर्षे नोकरी करून वर्षभरापूर्वी सेवानिवृत्त झाले. तेव्हापासूनच ते सेंद्रिय शेतीचा छंद बाळगून होते. ते १० वर्षांपासून सेंद्रिय शेती करीत आहेत. दरवर्षी किमान पाच एकर उसाची लागवड करून सेंद्रिय पद्धतीने ते जोपासत आहेत.
गूळ बनविण्यासाठी स्वतंत्र गूळघर बनविण्यात आले असून, गूळ तयार करण्यासाठी मनुष्यबळ व रोजचा खर्च असला तरी, सेंद्रिय शेतीमुळे जमिनीची पत टिकून राहते. विषमुक्त शेतीमुळे रासायनिक खते हद्दपार होऊन हल्ली वाढत असलेल्या कॅन्सरसारखे जीवघेणे आजार बळावणार नाहीत. तालुक्यात आतापर्यंत १० ते १५ शेतकरी अशा शेतीचा प्रयोग करीत असून, त्यांना यशही येत आहे. सेवानिवृत्त शिक्षक गुरव यांना उच्चशिक्षित मुलगा राहुल याचेही चांगले सहकार्य मिळत आहे.
प्रक्रिया अन् काळजी- रासायनिक खत किंवा औषधांचा वापर न करता सेंद्रिय पद्धत अवलंबण्यासाठी जीवामृतसारखी प्रक्रिया ते करीत आहेत. उसाला शेण खत, गांडूळ खत, पतंजली खत, जीवामृत याचा वापर करण्यात येत असून, याला भरपूर खर्च होत असला तरी रासायनिक अंश यात मिसळला जाणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे.
दहा वर्षांपूर्वी सेंद्रिय शेती व त्याचे फायदे जाणून घेतले. त्यानंतर यात उतरण्याचा निर्णय घेतला. सलग तीन वर्षे रासायनिक खतांचा वापर बंद केल्यानंतर खºया अर्थाने सेंद्रिय शेतीला सुरुवात झाली. सध्या दोन एकर गाळप झाले असून, आणखीन २ एकर ऊस गाळपास लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. सेंद्रिय शेतीचा मार्ग शेतकºयांनी अवलंबवावा.-सोमेश्वर गुरव, सेवानिवृत्त शिक्षक, सांगवी बु।।