अक्कलकोट : नववर्ष, दत्त जयंती, नाताळनिमित्त सुट्टी आहे. याकाळात भाविकांची स्वामी दर्शनासाठी भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी होते. कोरोनाकाळात संसर्ग होऊ नये यासाठी मंदिर समितीने अक्कलकोटचे स्वामी समर्थ मंदीरआठवडाभर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे २ जानेवारीपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंदच राहणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, मंदिर बंद असल्याची माहिती न समजल्यामुळे परराज्यातील भाविक अक्कलकोट नगरीत दाखल झाले आहेत. सकाळी काही भाविकांनी मंदिर समितीसमोर गोंधळ घातला. त्यानंतर पोलिसांनी गर्दी पांगविण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. अचानक निर्णय घेतल्याने परराज्यातील भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
श्री स्वामी महाराज मंदिरात प्रतिवर्षी २५ डिसेंबर ते २ जानेवारी अखेर नाताळ सुट्या, दत्तजयंती व नूतन वर्षानिमित्त स्वामी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. यातच २५ डिसेंबर रोजी नाताळ सुट्टी, २६ रोजी शनिवार व २७ रोजी रविवार सलग शासकीय सुट्या आहेत. २९ डिसेंबर २० रोजी श्री दत्तजयंती आहे. गुरुवारी ३१ डिसेंबर रोजी सरत्या वर्षास निरोप व शुक्रवार १ जानेवारी २०२१ रोजी नूतन वर्ष सुरुवात इत्यादी सलग गर्दीचे दिवस लक्षात घेऊन कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून प्रशासनाने २४ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून २ जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान बंद ठेवण्याचे व भाविकांना अक्कलकोट शहरात प्रवेश मनाई करण्याचे लेखीपत्राद्वारे आदेश दिले आहेत.
त्यानुसार २५ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून ते दिनांक २ जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत वटवृक्ष मंदिर पुन्हा बंद केल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी दिली. या कालावधीत कोणत्याही स्वामीभक्तांनी स्वामी दर्शनाकरिता मंदिराकडे येण्याचे टाळावे व स्वामीभक्तांनी आपल्या घरीच थांबून स्वामींची आराधना करावी, असे आवाहनही इंगळे यांनी केले आहे.