अकलूज येथे कोरोना पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी शमा पवार यांच्या अध्यक्षतेखाली माळशिरस तालुक्यातील डॉक्टरांची बैठक आयोजित केली होती. यावेळी त्या बोलत होत्या. पवार म्हणाल्या, आज राज्यात व देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेचा वृद्ध, तरुण, १५ वर्षांखालील लहान मुलांना फटका बसत असल्याचे निदर्शनास आल्याने लहान मुलांसाठी शासकीय मोफत कोविड रुग्णालय सुरू करण्यास शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व सिव्हिल सर्जन डॉ. प्रदीप ढेले यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीमध्ये अद्ययावत सोयीसुविधा असलेले १२ बेडचे मोफत बाल कोविड रुग्णालय सुरू करत आहोत.
माळशिरस तालुक्यात खासगी रुग्णालयातून कोविड रुग्णांवर उपचाराची सुविधा नसताना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर व आसपासच्या जिल्ह्यातील कोविड रुग्णांसाठी राज्यातील पहिले १०० बेडचे अद्ययावत कोविड रुग्णालय अकलूज येथील पर्यटन विकास महामंडळाच्या इमारतीत सुरु केले. सुमारे तीन महिने चालविलेल्या या कोविड रुग्णालयात सुमारे ४०० ते ५०० कोविड रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्याचा रुग्णांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला असल्याचे प्रांताधिकारी शमा पवार यांनी सांगितले.
यावेळी तहसीलदार जगदीश निंबाळकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. रामचंद्र मोहिते, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. श्रेणीक शहा, डाॅ. प्रवीण शिंदे आदी उपस्थित होते.
बाल कोविड रुग्णालयाला सहकार्य
अकलूज उपजिल्हा रुग्णालयात मोफत बाल कोविड रुग्णालय सुरू होत आहे, ही चांगली बाब आहे. गतवर्षी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड रुग्णालयासाठी शिवरत्न शिक्षण संस्थेने नर्सिंग स्टाफ उपलब्ध करून दिला होता. अकलूज ग्रामपंचायतीने इतर सोयीसुविधा पुरविल्या होत्या. तालुक्यातील सर्व खासगी डॉक्टर्सनी त्यास सहकार्य केले होते तसेच या बाल कोविड रुग्णालयास सहकार्य राहील, अशी माहिती उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.
कोट :::::::::::::::::::
अकलूज उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य इमारतीत दर महिन्यात १०० ते १२५ गर्भवती महिलांची डिलिव्हरी होते. त्यातील ५० टक्के महिलांचे सिझर होते. त्यामुळे या मुख्य इमारतीमध्ये बाल कोविड रुग्णालय सुरू करता येत नसल्याने ते उपजिल्हा रुग्णालयाच्या जुन्या कौलारू इमारतीमध्ये सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी अकलूज परिसरातील बालरोगतज्ज्ञ डॉक्टर मोफत सेवा देणार आहेत.
- डॉ. श्रेणीक शहा
अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, अकलूज