सोलापूर : महापालिकेच्या इंद्रभवन इमारतीजवळ थांबून थुंकणाºया युवकाला आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी हातरुमालाने सफाई करायला सांगितले. एवढेच नव्हे त्याला दंड आकारुन उठाबशा काढायला सांगितले. हे पाहून बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी आयुक्तांशी हुज्जत घालायला सुरुवात केली. ही हिटलरशाही असून असे वागू नका, असे चंदनशिवे यांनी सांगितले. पण मी कायद्याने वागतोय, असे आयुक्त डॉ.ढाकणे यांनी चंदनशिवे यांना सुनावले.
शिवजयंती मध्यवर्ती मंडळाचे काही पदाधिकारी आणि बसपाचे कार्यकर्ते मंगळवारी सायंकाळी इंद्रभवन परिसरात जमले होते. यादरम्यान, मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे कार्यालयातून बाहेर येते होते. गर्दीत थांबलेला एक कार्यकर्ता इंद्रभवन इमारतीजवळ थुंकत असल्याचे आयुक्तांच्या लक्षात आले. त्याला बोलावून खडसावले. खिशातील रुमालाने थुंकलेली सुपारी उचलायला सांगितले. त्याला दंड करावा, असे आदेश अधिकाºयांना दिले आणि उठाबशा करायला सांगितले. हे पाहून नगरसेवक आनंद चंदनशिवे युवकाच्या बाजूने धावले. दंड भरायला सांगा, पण उठाबशा का काढायला लावता, असा प्रश्न केला. उठाबशा काढण्यापासून त्या युवकाला रोखले. आयुक्त आणि चंदनशिवे यांच्यात खडाजंगी सुरू झाली. शिवसेना नेते पुरुषोत्तम बरडे यांनी चंदनशिवे यांना बाजूला घेण्याचा प्रयत्न केला.१५० रुपये दंड भरला.
महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार त्या युवकाने १५० रुपये दंड भरला. मी थुंकलो नव्हतो तर तोंडातील सुपारी खाली टाकली होती, असेही त्याने सांगितले. थुंकण्याबद्दल दंड करणे अथवा कायदेशीर कारवाई करणे याला आमचा विरोध नाही. शिस्त लागण्यासाठी कारवाई गरजेची आहे. पण जनसमुदायात त्याला पुसायला लावणे, उठाबशा काढायला लावणे या मानसिकतेला आमचा विरोध आहे. प्रहार संघटनेने मागे आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर तेल आणि आॅईलचे पाकीट फेकले होते. त्या कार्यकर्त्यांना आम्ही सुनावले होते. लोकशाही पद्धतीनं मोर्चा काढा. महापालिकेची इमारत खराब करू नका, असे बजावले होते. आम्हालाही स्वच्छतेची काळजी आहे. - आनंद चंदनशिवे, बसपा, गटनेते
आयुक्त अन् चंदनशिवे यांच्यातील (वि) संवादचंदनशिवे - साहेब.. हिटलरसारखे वागू नका तुम्ही.आयुक्त : (त्या युवकाकडे पाहून) जे असेल ते असेल.. पण इथून जायचे नाही. चंदनशिवे : (त्या युवकाकडे पाहून) काय करणार हाय तेनी, तू कशाला चालला. थांब कीऽऽ...थुंकला की नाही दाखव त्यांना. हिटलरशाहीसारखे करू नका साहेब तुम्ही. आयुक्त : बिलकुल नाही.चंदनशिवे : सर्वांना कायदे सारखे लावा साहेब तुम्ही. आयुक्त : तुम्ही चुकीच्या गोष्टीची बाजू कशाला घेताय?चंदनशिवे : तुमचे अधिकारी चूक करतात. प्लास्टिक बंदी असताना प्लास्टिक पिशव्या घेऊन येतात. आयुक्त : दाखवा ना तुम्ही. त्याच्यावरही कारवाई होईल. (अधिकाºयांकडे पाहून) किती दंड करताय यांना ?चंदनशिवे : (त्या युवकाकडे पाहून) हे चल रे. पैसे दे. पैसे भर. मी गुटखा खाल्लेला दाखवतो, प्लास्टिकच्या पिशव्या दाखवतो. आयुक्त : तुमच्याकडून ही अपेक्षा नाही. मी कारवाई करतोय आणि तुम्ही बाजू घेताय. मी तो थुंकला म्हणून बोलावले. चंदनशिवे : तुमचे कर्मचारी गुटखा खाऊन येतात. आयुक्त : मला काय त्याचे. जो दिसेल त्याच्यावर कारवाई होईल. पण हे तर खूपच झालं. प्रत्येक गोष्टी तुम्ही अशा करत जाऊ नका. चंदनशिवे : ओ साहेबंऽऽ मी पण करत नसतो. कायद्यानं चालत असतो. आयुक्त : कायद्यानंच चालत राहा.
आयुक्तांची ही भूमिका योग्य की अयोग्य ?सोलापूरकरांनो कळवा.. Yes किंवा No सोलापूर महापालिकेच्या ‘इंद्रभवन’ या ऐतिहासिक इमारत परिसरात थुंकल्याप्रकरणी आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी एका नागरिकाला उठा-बशा काढण्याची जी शिक्षा ठोठावली; ती योग्य आहे काय ? एक जबाबदार अन् सूज्ञ सोलापूरकर म्हणून तुम्हाला काय वाटतं ? उचला मोबाईल अन् कळवा या 9763174200 व्हॉट्स-अॅप क्रमांकावर... Yes किंवा No .. नाव सांगण्याची गरज नाही !