संताजी शिंदेसोलापूर : दारू पिणं आनंदासाठी असो की दु:ख विसरण्यासाठी ती मिळालीच पाहिजे, असा हट्ट असलेल्या मद्यपींनी व त्याची विक्री करण्यासाठी चोरट्यांनी थेट शहरातील दोन तर जिल्ह्यातील तीन वाईन शॉप व परमिट रूमवर निशाणा साधला आहे. सहा ठिकाणी चोरी केल्याच्या घटना घडल्या असून, मद्यपींची तात्पुरती गरज या चोरट्यांनी भागवली आहे.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने संचारबंदी लागू केली आहे. दि. २३ मार्चपासून सुरू असलेल्या संचारबंदीत शहर व जिल्ह्यातील मद्यविक्रीही पूर्णत: बंद केली आहे. परमिट रूम व वाईन शॉप बंद असल्याने सध्या तळीरामांची मोठी पंचाईत होत आहे. काही दिवस दुप्पट, तिप्पट आणि चौपट पैसे देऊन मद्य खरेदी केली. सध्या कोठेच मद्य मिळत नसल्याने मद्यपी तणावात आले आहेत. याच तणावातून एप्रिल महिन्यात विजापूर रोडवरील निशा परमिट रूम फोडण्यात आले. अज्ञात चोरट्यांनी आतील हव्या असलेल्या दारूच्या बाटल्या चोरून नेल्या होत्या. जुळे सोलापूर येथील गुलमोहर वाईन शॉप फोडण्यात आले. वाईन शॉपमधील पाहिजे असलेल्या दारू व बिअरच्या बाटल्या चोरून नेल्या होत्या. या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेले देशी दारूचे दुकान चोरट्यांनी फोडले होते. मात्र, दारूच्या बाटल्यांऐवजी तेथील ड्रॉव्हरमध्ये ठेवलेली रोख रक्कम चोरून नेली होती. सांगोला शहरातील एक परमिट रूम फोडण्यात आले होते. या ठिकाणीही दारूच्या बाटल्या चोरून नेल्या होत्या. उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव येथे एका किरकोळ व्यापाºयाचे गोडावून फोडण्यात आले. अज्ञात चोरट्यांनी गोडावून फोडून आतील दारूचे बॉक्स चोरून नेले. सहा ठिकाणी झालेल्या चोºयांमध्ये ७ ते ८ लाखांचा माल चोरीला गेला.
अक्कलकोट शहरात एक लाख ९४ हजारांच्या दारूची चोरी - अक्कलकोट-सोलापूर रस्त्याच्या कडेला असलेले रुबी हे परमिट रूम फोडल्याचा प्रकार सोमवारी सकाळी ७ वाजता उघडकीस आला. अज्ञात चोरट्यांनी आतील बिअर, व्हिस्की, रम अशा प्रकारच्या विविध कंपन्यांची दारू असलेल्या बाटल्या चोरून नेल्या. परमिट रूममधून एकूण एक लाख ९४ हजार ४६० रुपये किमतीचा माल चोरून नेला. वास्तविक पाहता इतका मोठा माल स्वत:ला पिण्यासाठी नव्हे तर तो काळ्या बाजारात विकण्यासाठी चोरून नेला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
तिप्पट, चौपट दराने विकली जाते दारू
- - सध्या वाईन शॉप व परमिट रूम बंद असल्याने मद्यपींना मोठी अडचण झाली आहे. चोरून कुठे दारू मिळते का, याचा शोध मद्यपी दररोज घेत आहेत. ज्या ठिकाणी चोरून दारू विकली जात आहे तेथे १५० रुपयांची दारू ५०० रुपये, ६०० रुपये तर काही ठिकाणी ७०० रुपयांपर्यंत विक्री केली जात आहे.
- सुरक्षेसाठी काही उपाययोजना नाही...
- - चोरट्यांनी व मद्यपींनी सध्या परमिट रूम व वाईन शॉपला लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. मात्र, मालकांनी आपल्या परमिट रूमच्या सुरक्षेसाठी काही उपाययोजना केल्याचे दिसून येत आहे.