माळशिरस तालुक्यातील महाळुंग-श्रीपूर नगर पंचायतीमध्ये रूपांतर झाल्याचा नगरविकास मंत्रालयाचा आदेश पारित झाला आहे. परंतु ९ मार्चपासून नगर पंचायतीचे आदेश सुरू झाल्यामुळे सध्या त्या ठिकाणी गावचा कारभार पाहण्यासाठी कोणीही सक्षम अधिकारी उपलब्ध झालेला नाही. दोन दिवसापूर्वी तहसीलदारांनी भेट देऊन पाहणी केली. परिसरातील नागरिक रोज वेगवेगळ्या प्रकारचे दाखले मागण्यासाठी कार्यालयांमध्ये हेलपाटे घालत आहेत, परंतु त्या ठिकाणी सध्या अधिकारी नसल्यामुळे कोणतेही दाखले मिळत नाहीत.
तसेच ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर श्रीपूरमधील जगदीश भाजी मंडईमध्ये असणारा पिण्याच्या पाण्याचा आरो प्लांट देखील बंद पडलेला आहे. त्यामुळे सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
वेळीच जिल्हाधिकारी यांनी या ठिकाणी ताबडतोब सक्षम मुख्य कार्यकारी अधिकारी नेमण्याची मागणी महाळुंग-श्रीपूर परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
पाणी, घरपट्टी वसुली रखडली
श्रीपूर मंडईमधील शुद्ध पाणीपुरवठा बंद. नदीकडून येणारी पाईपलाईन फुटली. वीज बिले थकल्यामुळे वीजपुरवठा केव्हाही खंडित होऊ शकतो. मार्चमध्ये होणारी सर्व वसुली थांबली आहे. .