संताजी शिंदे सोलापूर : आयुष्यभर एसटीचा चालक म्हणून नोकरी केली. निवृत्तीनंतर चांगले व्याज मिळते म्हणून फायनान्समध्ये पैसा गुंतवला. वयाची ७३ वर्षे ओलांडली; मात्र आयुष्याच्या शेवटी फसवणूक झाली. कष्टाचे पैसे परत मिळावेत म्हणून लढा देतोय, अशी खंत एका वृद्धाने व्यक्त केली. वस्तुत: ही व्यथा अनेक गुंतवणूकदारांची आहे काहीजण तर पैशाच्या चिंतेने आजारी पडले आहेत.
रामेश्वर विशलिंग विभूते (वय ७३, रा. भवानी पेठ, सोलापूर) हे महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या एस.टी. चे चालक आहेत. निवृत्त झाल्यानंतर व्याज जास्त मिळेल या आशेपोटी पैसे काटगावकर याच्या फायनान्समध्ये गुंतवले. फायनान्स बंद पडला. आयुष्याची पुंजी हातातून निघून गेली. सध्या मिळेल ते काम करून रामेश्वर दिवस काढत आहेत. नरसिंग दहिहांडे यांनी बैलगाडीचा व्यवसाय करून जमा केलेले अडीच लाख रुपये फायनान्समध्ये जमा केले. पैसे गेल्याचे समजताच मुलांनी त्यांना घराबाहेर काढले. आज ते पत्नीसोबत मजुरी करून जगत आहेत. लक्ष्मीकांत सदाशिव इंगळे (वय ६५) यांनी सेवानिवृत्तीनंतर २०१३ साली ५ लाख रुपये गुंतवले होते. पैशाच्या तणावात त्यांची दोनवेळा बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शारदा राम परळकर (वय ५५) यांनी ५ लाख गुंतवले आहेत, त्यांना सध्या रक्तदाब (बीपी) चा आजार जडला आहे. न्यायालयात खटला सुरू आहे, तारखेच्या दिवशी ठेवीदार येतात. सुनावणी झाली तर ऐकतात, तारीख मिळाली तर निघून जातात.
काटगावकर खटला अन् पार्श्वभूमी- शेखर रेवणसिद्ध काटगावकर (वय ५३) याने सुरुवातीला भवानी पेठ येथील बलिदान चौकात शासकीय परवाना घेऊन मनिलँडरिंगचा व्यवसाय सुरू केला. कालांतराने त्याचे रूपांतर मे. कमर्शियल फायनान्स, रिद्धी-सिद्धी फायनान्स, मे. नवरत्न फायनान्स, मे. हरिओम फायनान्समध्ये झाले. एक हजार ३५५ ठेवीदारांनी ४५ कोटी ८८ लाख तीन हजार ८८० रुपयांच्या ठेवी फायनान्समध्ये ठेवल्या. जानेवारी २०१६ मध्ये फायनान्सने अचानक व्याज देणे बंद केले. ठेवीदारांनी विचारणा केली असता, दोन महिन्यानंतर दिली जाईल असे सांगण्यात आले; मात्र दोन महिन्यानंतर फायनान्सचा मालक शेखर काटगावकर, पत्नी सुकेशनी काटगावकर, नागेश काटगावकर हे तिघे कार्यालय बंद करून पळून गेले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सचिन चंद्रकांत शिंदे (वय ३२, रा. उत्तर कसबा, टिळक चौक, सोलापूर) यांनी दि.२८ एप्रिल २०१६ रोजी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी शेखर रेवणसिद्ध काटगावकर (वय ५२), सुकेशनी शेखर काटगावकर (वय ४३, दोघे रा.मंत्री चंडक नगर, भवानी पेठ, सोलापूर), नागेश रेवणसिद्ध काटगावकर (वय ४७, रा. १४५, पश्चिम मंगळवार पेठ, तुळजापूर वेस, सोलापूर) या तिघांविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दि.१० मे २०१६ रोजी शेखर काटगावकर याला भवानी पेठेतील कार्यालयातून अटक करण्यात आली होती. सुकेशनी काटगावकर यांना दि.९ मे २0१६ रोजी अटक झाली होती. नागेश काटगावकर फरार होता, त्याने दि.२ जानेवारी २०१७ रोजी मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळवला. सध्या सुकेशनी काटगावकर व नागेश काटगावकर हे जामिनावर बाहेर आहेत. शेखर काटगावकर हा जेलमध्ये आहे. सध्या न्यायालयात हा खटला सुरू आहे.
आजवर करण्यात आलेल्या तपासात काटगावकर याच्या बºयाच मालमत्तेचा शोध लागलेला आहे. न्यायालयाने सर्व मालमत्ता सील केल्या आहेत. अन्य काही मालमत्तेचा शोध लागला असून त्याची सील करण्याची मागणी करण्यात आली आहे. गुंतवणूकदार सेवानिवृत्त कर्मचारी, व्यापारी, धुणीभांडी करणाºया महिला, छोटे-मोठे विक्रेते अशा अनेक लोकांच्या ठेवी आहेत. - अॅड. संतोष न्हावकर विशेष सरकारी वकील