: माढा तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कुर्डूवाडी सह मोडनिंब, टेंभुर्णी, लऊळ, कुर्डू, मानेगाव, माढा, उपळाई (बु), उपळाई (खु) या मोठ्या गावांबरोबरच छाेट्या गावातील दवाखाने कोरोना बाधित रुग्णांची फुल्ल झाले आहेत. त्या मानाने येथील शासकीय यंत्रणा ही तोकडी पडू लागलेली आहे.
सध्या काही बाधित अत्यावश्यक रुग्णांना ही येथील कोणत्याच प्रतिबंधात्मक हेल्थ सेंटरमध्ये आवश्यक असणारे ऑक्सिजन बेडस्, व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेक रुग्णांना त्याचा सध्या फटका बसू लागलेला आहे. यावर पर्याय म्हणून येथील तालुका आरोग्य विभागाने सध्या टेंभुर्णीतील तीन हॉस्पिटल, कुर्डूवाडी येथील ग्रामीण रुग्णालय, मोडनिंबमध्ये असणारी दोन मंगल कार्यालय ही या कोविड बाधित रुग्णांच्या अत्यावश्यक सेवेसाठी प्रस्तावित केले आहेत. त्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्यास दोन दिवसांत तेथे सेवा सुरू होतील, असे आराेग्य विभागाने सांगितले.
तालुक्यामध्ये सध्या एकूण ९९४ बाधित रुग्ण असून सर्वांवर उपचार सुरू आहेत. परंतु कुर्डूवाडी शहराबरोबरच सर्वच सेंटरमध्ये ना ऑक्सिजन बेड, ना व्हेंटिलेटर, ना येथील रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व पदाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
माढा तालुक्यात कुर्डूवाडीत सध्या प्रतिबंधात्मक हेल्थ सेंटर तीन आहेत. मात्र यामध्ये उपलब्ध असणारे सर्व बेड हे बाधित रुग्णांनी भरले आहेत. त्यामुळे नव्याने येणाऱ्या अत्यावश्यक रुग्णांना येथून सेवा देता येत नाही. टेंभुर्णीतील एका हॉस्पिटलमधील ही बेड रुग्णांनी हाऊस फुल्ल झाले आहेत. यामुळे येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी थोरात यांनी कुर्डूवाडी येथील उपविभागीय अधिकारी ज्योती कदम यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे टेंभुर्णी येथे तीन हॉस्पिटल व ग्रामीण रुग्णालय यांना प्रतिबंधात्मक हेल्थ सेंटर सुरू करण्यासाठी प्रस्तावित केलेले आहे. मोडनिंब येथील एका मंगल कार्यालयात कोविड केअर सेंटर म्हणून मंजुरी मिळावी यासाठी प्रस्ताव पाठविला आहे.
सध्या कुर्डूवाडी येथे समाजकल्याण विभागांतर्गत असलेल्या वसतिगृहामध्ये शुक्रवारी कोविड केअर सेंटर सुरू केलेले आहे. माढा शहर येथील सध्याचे वसतिगृहातील कोविड केअर सेंटरमध्ये १४ बेड शिल्लक आहेत. त्यामुळे एकंदरीतच येथील रुग्णांना येथील सर्वच यंत्रणा ही अपुरी पडत असल्याने त्याचा त्रास रुग्णांना सहन करावा लागत आहे.
लसीचा ही तुटवडा
माढा तालुक्यातील १० लसीकरण केंद्रातील लाभार्थ्यांना देण्यात येणारी लस ही उपलब्ध नसल्याने त्याचाही फटका येथील रुग्णांबरोबर सर्व सामान्य नागरिकांना बसत आहे. त्यामुळे आता नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. त्यानंतर लस उपलब्ध झाल्यानंतर १०० टक्के लसीकरण करून घेणे हाच पर्याय आहे, असे कुर्डूवाडी व्यासपीठाचे अध्यक्ष डॉ. विलास मेहता यांनी सांगितले.
कोट :::::::::
माढा तालुक्यात चाचण्या वाढविल्याने बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. परिणामी सध्याची आरोग्य यंत्रणा कमी पडू लागली आहे. त्यामुळे आणखी यंत्रणा उभी करण्यासाठी येथील उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत काही हॉस्पिटलचे नव्याने प्रस्ताव पाठविलेले आहेत. ते मंजूर झाले की ही स्थिती बदलेल.
- डॉ. शिवाजी थोरात,
तालुका आरोग्य अधिकारी,माढा
कोट ::
आमच्याकडे उपलब्ध असलेल्या सर्व सेवा रुग्णांना देत आहोत. परंतु सध्या रेमडेसिविर इंजेक्शन हे उपलब्ध नाही. याबाबत वरिष्ठांनी योग्य निर्णय घ्यायला पाहिजे. सध्या हॉस्पिटलमधील सर्व बेड हे फुल्ल आहेत. त्यामुळे नव्याने येणाऱ्या रुग्णांना सेवा देण्यात अडथळा निर्माण होत आहे.
- डॉ. रोहित बोबडे,
प्रमुख, प्रतिबंधात्मक हेल्थ सेंटर
तालुक्यातील सद्यस्थिती
होम क्वारंटाईन ६२८, सीसीसी २२६, डिसीएचपी ११८, डिसीएच ७, इतर १५