सोलापूर : भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाणारी वंदे भारत एक्सप्रेस ही इलेक्ट्रिक मल्टी-युनिट ट्रेन आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ट्रेनचा चालवण्याचा वेग जास्त आहे. राज्यात सात मार्गावर चालणाऱ्या एक्सप्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून ऑगस्ट महिन्यात या गाड्यांमधून मिळणारे उत्पन्न रेल्वे प्रशासनाच्यादृष्टीने दिलासादायक आहे.
दरम्यान, राज्यात बिलासपूर-नागपूर या वंदे भारत ट्रेनचे ऑगस्टमधील उत्पन्न १०४ टक्के आहे. याशिवाय नागपूर-बिलासपूरचे उत्पन्न ८६ टक्के, मुंबई-सोलापूर ९५ टक्के, सोलापूर-मुंबई ९४ टक्के, मुंबई-गोवा ९५ टक्के, मुंबई-शिर्डी ८० टक्के, शिर्डी ते मुंबई ७८ टक्के एवढे उत्पन्न मिळाले आहे.
दिवसेंदिवस वंदे भारत ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. प्रत्येक वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये २ एक्झिक्युटिव्ह क्लासचे डबे आणि १४ चेअर कार कोच आहेत, त्यामुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायी होत आहे. भविष्यात राज्यात आणखीन वेगवेगळ्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालविण्याचा रेल्वे प्रशासन प्रयत्न करीत आहे.