सोलापूर : युक्रेन देशातील डेनप्रो शहरामध्ये अडकलेले सोलापूरचे सर्व विद्यार्थी हे हंगेरी व रोनानियाच्या दिशेने निघाले आहेत. डेनप्रोमध्ये देखील हल्ल्याची शक्यता असल्याने सर्व विद्यार्थ्यांनी हॉस्टेल रिकामे केले आहेत. बंकरमधून सुटका झाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
युक्रेनमधून बाहेर पडण्यासाठी सोलापूरच्या विद्यार्थ्यांनी बस आधीच बुक केली होती; पण तिथे बर्फ पडल्याने बस रद्द करण्यात आली. बुधवारी सकाळी (भारतीय वेळेनुसार) बस पुन्हा डेनप्रो युनिव्हर्सिटी येथे आली. विद्यार्थ्यांचा बसमधून रोमानिया व हंगेरीकडे प्रवास सुरू झाला आहे. डेनप्रो येथून सोलापूरचे एकूण १२ विद्यार्थी रोमानियाच्या दिशेने निघाले आहेत. डेनप्रो युनिव्हर्सिटीमधून आठ बस निघाल्या असून, या बसमधून सोलापूरचे विद्यार्थी प्रवास करीत आहेत.
----
पुढचा प्रवास असा...
सोलापूरचे विद्यार्थी हे रोमानिया आणि हंगेरीच्या बॉर्डरवर पोहोचतील. तिथून त्यांच्या कागदपत्राची तपासणी झाल्यानंतर त्यांना रोमानिया व हंगेरी या देशात प्रवेश देण्यात येईल. विमानाची व्यवस्था होईपर्यंत विद्यार्थ्यांना तिथेच थांबावे लागणार आहे. एक ते दोन दिवसांत विमानाची व्यवस्था झाल्यानंतरच ते भारताकडे विमानाने निघतील.
------
डेनप्रो ते रोमानिया ११४४ किलोमीटर
डेनप्रो ते रोमानियामधील अंतर हे ११४४ किलोमीटर, तर डेनप्रो ते हंगेरी १५१८ किलोमीटर इतके आहे. युक्रेनमधील काही ठिकाणी आधीच बॉम्ब हल्ला झाला आहे, तर इतर ठिकाणी बॉम्ब हल्ल्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चोरवाटांद्वारे रोमानिया, हंगेरी येथे नेण्यात येत आहे. दूरचा रस्ता निवडल्यामुळे डेनप्रो ते रोमानिया व डेनप्रो ते हंगेरी अंतर अधिक वाढणार आहे.
-------
रोमानियातून निघण्यासाठी व्हिसाची नाही गरज
युक्रेनधील सोलापूरचे विद्यार्थी हे रोमानियातून भारताकडे निघणार आहेत. युक्रेन-रोमानिया बॉर्डरवर या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी होणार आहे. मात्र, या विद्यार्थ्यांना रोमानियात येण्यासाठी किंवा तिथून विमानात बसण्यासाठी व्हिसाची गरज नसल्याचे भारत सरकारने सांगितले आहे.