माढा : आठ सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळून लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका माध्यमिक शिक्षकासह तिघांना माढा न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. टी. गित्ते यांनी तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच इतर दोघांची निर्दोष मुक्तता केली.
सुधीर जनार्दन माने (रा. आष्टी, ता. मोहोळ), जहाॅगीर चाँद तांबोळी (रा. सन्मतीनगर, माढा) व ज्ञानेश्वर श्रीरंग बाबर (रा. मिरे, ता. माळशिरस) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच संदीप पोपट वाघमोडे-पाटील (रा. लासुर्णे, ता. इंदापूर, जि. पुणे) व हरिभाऊ सुरेश आटोळे (रा. डोलेवाडी, ता. बारामती, जि. पुणे) या दोघांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात फसवणूक झालेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना काही प्रमाणात नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले.
माढा परिसरातील आठ जणांना शासकीय विविध ठिकाणी नोकरीस लावतो म्हणून वरील आरोपींनी लाखो रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली होती. याप्रकरणी २०१७ मध्ये बाळू पासले यांनी माढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
आरोपी सुधीर माने याने तिघांना तर जहॉगीर तांबोळी व ज्ञानेश्वर बाबर यांनी दोघांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात सतरा जणांच्या साक्षी झाल्या. आरोपींनी साक्षीदारांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांना त्यासाठी पैसे देण्यास प्रवृत्त केले, ही घटना साखळी पद्धतीने पूर्ण केली असल्याचा निष्कर्ष न्यायालयाने काढला.
या खटल्यात ॲड. पी.जे. कुलकर्णी, ॲड. एन.डी.भादुले व ॲड. व्ही.पी. सक्री या तिघांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले.