माळशिरस : यंदाच्या आर्थिक वर्षात जागतिक महामारीचा सामना करताना विकासकामांवर परिणाम जाणवत आहे. यातच लॉकडाऊन, प्रतिबंधात्मक योजना व आचारसंहिता विकासकामात आडकाठी ठरत आहे. नुकतेच पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली. यामुळे तालुक्यातील विविध योजनेच्या विकासकामांना खीळ बसली आहे. यातील कोट्यवधी रुपयांचा निधी वर्षाअखेर मार्गी न लागल्यास परत शासनाकडे जाणार आहे.
यावर्षीच्या आर्थिक वर्षात कोरोना महामारीनंतर पदवीधर मतदारसंघ निवडणुका, ग्रामपंचायत निवडणुका व सध्या विधानसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिता यामुळे वर्षभरात विकासकामांना मुहूर्त साधता आला नाही. सध्या वेगवेगळ्या योजनेअंतर्गत विकासकामांच्या मंजुऱ्या अंतिम टप्प्यात आल्या होत्या. याशिवाय वर्षाखेर जवळ आल्याने विकासकामे मार्गी लावण्यासाठी अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या हालचालींना वेग आला होता. असे असतानाच पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची आचारसंहिता जाहीर झाली. यामुळे जिल्ह्यात पुन्हा सुरू होणाऱ्या विकासकामांना खीळ बसली आहे.
या विकासकामांना बसली झळ
१४, १५वा वित्त आयोग, जनसुविधा, दलितवस्ती, आमदार, खासदार फंड, २५/१५ योजनेअंतर्गत पाणीपुरवठा, मनरेगा, केंद्र व राज्य सरकारच्या योजना अशा वेगवेगळ्या योजनेतील कामांना मंजुरी घेता येत नाही. त्यामुळे साहजिकच यातील काही कामांचा विकास निधी नियोजित कामासाठी वापरणे अडचणीचेेे ठरणार आहे. काही योजनांमधील निधी पुढील वर्षात वापरता येणार नाही.
कोट :::::::::::::::::::
वर्षभरातील विविध अडचणींमुळे वर्षाअखेर वेगवेगळ्या योजनेतील विकासकामे मार्गी लागतील, अशी अपेक्षा होती. मात्र सध्या संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता जाहीर झाली आहे, तर वर्षाअखेर असल्याने अनेक विकासकामांना अडथळा येत आहे. त्यामुळे फक्त निवडणुकीच्या ठिकाणी आचारसंहिता असावी, इतर ठिकाणी शिथिलता झाली तर विकासकामे मार्गी लागतील. त्यामुळे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे.
- अर्जुनसिंह मोहिते-पाटील
उपसभापती, पंचायत समिती