सोलापूर : सिध्देश्वर यात्रेसाठी लागू करण्यात आलेला संचारबंदीचा आदेशात थोड्या प्रमाणात बदल करून पार्क चौकातील दुकाने, आस्थापने सुरू करण्यास परवानगी द्यावी, पोलीस बंदोबस्त मंदीर प्रवेशव्दारासमोर लावून पार्क चौकातील दुकानासमोरील रस्ता खुला करून देण्याची मागणी पार्क रोड शोरूम्स असोसिएशनच्यावतीने केली आहे. याबाबत पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांना निवेदन देण्यात आल्याचे उद्योजक केतन शहा यांनी सांगितले.
ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वर यात्रा कोरोनामुळे साध्या पध्दतीने होत आहे. यात्राकाळात गर्दी होऊ नये यासाठी सोलापूर शहर पोलिस प्रशासनाने मंदिर परिसरात संचारबंदीचा आदेश लागू केला आहे. या आदेशामुळे पार्क चौक परिसरातील सर्व दुकाने, आस्थापने बंद ठेवण्यात आली आहेत. या निर्णयामुळे पार्क चौक परिसरातील १०० दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. यामुळे लाखो रूपयांचे नुकसान होत आहे. तरी शहर पोलिसांनी सिध्देश्वर मंदीर प्रवेशव्दारासमोर पोलिस बंदोबस्त लावून पार्क चौकातील आमची दुकाने खुली करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे.