ज्योतीराम शिंदे
पंढरपूर : कोरोनाच्या संकटानं विठ्ठल-रुक्मिणी मंदिर अद्याप बंद आहे. प्रशासनाकडून दुकाने उघडायला परवानगी दिली तर खरी; पण लॉकडाऊनमुळे गावोगावी भाविक अडकले आहेत. अशावेळी आमचा धंदा कसा होणार? मंदिर दर्शनासाठी खुले करावे अशी मागणी करीत ‘उघड दार देवा आता... उघड दार देवा...’ अशी हाक मंदिर परिसरातील व्यापाºयांमधून होऊ लागली आहे.
मंदिर बंद असल्याने परिसरातील दुकाने अद्यापही बंदच आहेत. यामुळे ज्यावर त्यांची उपजीविका आहे हे व्यापारी अडचणीत आले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यात पहिल्यांदा लॉकडाऊन करण्यात आला. त्यानंतरही कोरोनाबाधितांची संख्या वाढतच राहिल्याने सलग अडीच महिने हा लॉकडाऊन सुरू राहिला. याकाळात जनजीवन विस्कळीत झाले. शिवाय व्यापारपेठा ठप्प झाल्याने आर्थिक गणित कोलमडले. धार्मिक स्थळे बंद झाल्याने त्या परिसरातील दुकानेही बंदच राहिली.
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मंदिरही गेल्या अडीच महिन्यांपासून बंद आहे. परिणामी मंदिर परिसरातील प्रासादिक साहित्यासह खेळणी, फोटोफ्रेम, स्टेशनरी, बांगड्या विकणारे अशी मिळून सुमारे दीडशे दुकाने बंदच आहेत. प्रशासनाने काही अटी घालून बाजारपेठा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केल्यावर इतर दुकाने सुरू झाली. परंतु, पंढरपुरातील मंदिर परिसरातील दुकाने मात्र अद्यापही बंदच आहेत.
महाराष्टÑाची दक्षिण काशी म्हणून विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला संबोधले जाते. मंदिरच बंद असल्यामुळे दळणवळणाची प्रक्रिया ठप्प झाली. दर्शनासाठी येणाºया भाविकांसाठी दूरवरुन पांडुरंगाच्या दर्शनासाठी येण्यावर निर्बंध घालण्यात आले. विशेषत: पुणे, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, मराठवाडा आदी भागातून येथे दररोज हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात; मात्र कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हे भाविक आपापल्या गावी अडकून पडले आहेत. मंदिरात नित्योपचार सुरू आहेत, परंतु बाहेरून येणाºया भाविकांना अद्याप प्रवेश नसल्याने हे परिसरातील चित्र सुनेसुने भासू लागले आहे. एरव्ही भाविक, वारकºयांनी गजबजणारा परिसर भक्तांविना निर्मनुष्य दिसत आहे. याचाच परिणाम मंदिर परिसरातील दुकानांवरही झाला आहे. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक नसल्याने दुकानालाही ग्राहक नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
आस पांडुरंगाच्या दर्शनाची- अडीच महिने घरामध्ये अडकून नैराश्य येऊ लागले आहे. अशावेळी ऊर्जा मिळावी म्हणून पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागून राहिली. सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी ज्ञानेश्वर कोकाटे, नानासाहेब अमृतकर, अनंत गुर्जर, लक्ष्मीकांत थोरात, बाबुराव जाधव यांच्यासह भागवत सांप्रदायातील वारकºयांमधूनही होऊ लागली आहे.
नियम, अटी लादून परवानगी द्या- आषाढीच्या निमित्ताने सावळ्या विठ्ठलाचे रूप कधी एकदा डोळ्यात साठवून ठेवू अशी शेकडो भाविकांची अवस्था झाली आहे; मात्र कोरोनाच्या संकटाने कधी नव्हे ते पांडुरंग आणि भाबड्या भक्तांमध्ये अंतर पडले आहे. अन्यत्र नियम, अटीचे निर्देश देत मंदिरांना दर्शनासाठी प्रवेश दिला जात असताना इथेही तशी परवानगी द्यावी, अशी मागणी पंढरीतील धनंजय लाड, नानासाहेब कवठेकर, सादिक मुलाणी, माऊली देशपांडे, गणेश गुंडेवार, सत्यविजय मोहोळकर यांच्यासह अनेक व्यापाºयांकडून होऊ लागली आहे.