संताजी शिंदे
सोलापूर : धाकटा राजवाडा कुंभारवेस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आठवड्यातील कामाच्या एक दिवसाचा पगार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवासाठी जमा करून साजरी करीत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीच्या तयारीला सुरूवात झाली आहे. शहरातील अनेक उत्सव मंडळे व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून भव्य आणि दिव्य अशी जयंती साजरी केली जाते. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिष्ठापना केली जाते. १४ एप्रिलनंतर येणाºया रविवारी शहरातून मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढली जाते.
दरम्यान, विविध मंडळांच्या वतीने सामाजिक कार्यक्रम व उपक्रम राबविले जातात. धाकटा राजवाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वर्गणीवर जास्त भर न देता काम करणाºया तरूणांच्या उत्पन्नातून जयंती साजरी केली जाते. संस्थेकडे २५0 कार्यकर्ते असून, हे सर्वजण दोरी करणे, मंगळवार बाजारात व्यापार करणे आदीकामे करतात.
जानेवारीपासून एप्रिलपर्यंत हे कार्यकर्ते आठवड्यातील एका दिवसाचे उत्पन्न फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी ठेवतात. एक दिवसाचे जे काही उत्पन्न असेल ते महिनाअखेर संस्थेकडे जमा करतात. साडेतीन महिन्यांचे उत्पन्न साधारणत: दोन ते अडीच लाख रूपये जमा होतात. या आलेल्या पैशातून संस्थेमार्फत विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. मिरवणुकीच्या दिवशी समाजप्रबोधनावर आधारित देखावा सादर करीत मिरवणूक काढली जाते. उत्सवात धाकटा राजवाडा येथील लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचा सहभाग असतो.
शिक्षण घेत काम करणारा तरूण वर्ग...- काम करणाºया तरूणांमध्ये अनेक तरूण हे शिक्षण घेत आहेत. ११ वीपासून पदवीच्या तृतीय वर्षापर्यंत शिक्षण घेणारी तरूण मुले काम करतात. न लाजता ही तरूण मुले काम करीत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला समाज घडविण्यासाठी काम करीत ही मुले शिक्षण घेत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे समाजाचाच नव्हे तर संपूर्ण बहुजनांचा उद्धार झाला़ त्यांची जयंती जीव की प्राण समजली जाते. तरूणांसाठी एप्रिल महिना हा उत्सवाचा, आनंदाचा आणि दिवाळीसारखा असतो.
दलित व बहुजन समाज शिकावा, तो मुख्य प्रवाहात यावा हा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून आयुष्यभर चळवळ केली. समाजाला न्याय मिळवून दिला़ त्यांच्या उपकाराची उतराई समाज कधीही करणार नाही.त्यांची जयंती आमच्यासाठी दिवाळी आहे.- सूरज गायकवाडसंस्थापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्था.