सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात अटीतटीची लढत देणारे काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. प्रकाश आंबेडकर यांची शनिवारी सकाळी हॉटेल बालाजी सरोवरमध्ये अचानक भेट झाली. दोघांनी एकमेकांची चौकशी केली. ‘तुम्ही इथं थांबलात का’ ?, असा प्रश्न शिंदे यांनी विचारल्यानंतर, ‘सोलापूरच्या लोकांनी आम्हाला घर दिलंय, तिथेच आम्ही राहतो’ असे स्पष्टीकरण आंबेडकर यांनी दिले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर प्रचारानिमित्त सोलापुरात मुक्कामी होते. त्यांना भेटण्यासाठी सुशीकुमार शिंदे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी शनिवारी सकाळी सोलापुरातील हॉटेल मध्ये पोहोचले. तिथे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्त्यांची गर्दी होती. प्रकाश आंबेडकरही इथेच असल्याचे समजल्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर कुठे आहेत, अशी कार्यकर्त्यांकडे विचारणा केली.
प्रकाश आंबेडकर, बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे, जीएम ग्रुपचे बाळासाहेब वाघमारे नाश्ता करीत होते. शिंदे अॅड. आंबेडकर यांच्याजवळ गेले. दोघांनी एकमेकांची चौकशी केली. नाश्ता करा म्हटल्यानंतर शिंदे यांनी नको म्हणत शिवराज पाटील चाकूरकर यांना भेटण्यासाठी आलो होतो. तुम्ही इथच थांबलात का ? असे शिंदे यांनी विचारताच, सोलापूरच्या लोकांनी घर दिलंय. आम्ही इथेच राहतोय, असे सांगितले.
प्रकाश आंबेडकर अकोल्यासह सोलापुरातून निवडणूक लढवित आहेत. १० एप्रिलपासून ते सोलापूर मुक्कामी आहेत.