सेवा पुरविल्याने अनेकांना जीवदान मिळाले आहे.
कोरोना काळात रुग्णवाहिका चालकांनी तत्परतेने कर्तव्य पार पाडल्याने सोलापूर जिल्ह्यातील १०८ क्रमांकाच्या ३५ रुग्णवाहिकेसाठी ८० चालक आणि १०८ डॉक्टर्स रुग्णांना सेवा देत आहेत. यापैकी १४ रुग्णवाहिका कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवल्या आहेत. जिल्ह्यातील रुग्णवाहिकामधून गेल्या आठ महिन्यांत विविध अपघातांतील हजारो अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळवून देण्याबरोबर हृदयरोग, भाजलेले, गंभीर इजा झालेल्या रुग्णांना रुग्णालयात पोहोचवून त्यांना जीवनदान देण्याचे काम १०८ रुग्णवाहिकेने केले आहे.
सोलापूर जिल्ह्यात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत ३५ रुग्णवाहिकांमधून तब्बल २९ हजार ६७९ रुग्णांना सेवा दिली आहे. यात २१,३२८ कोरोनाबाधित रुग्णांना तत्पर सेवा देऊन जीवदान दिले आहे, तर इतर ८,३५१ रुग्णांना रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करून मदत केली आहे .
कोरोनाच्या काळात त्यांना कोरोना रुग्ण हाताळणीचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. आवश्यक साहित्याचा मुबलक पुरवठा करण्यात आला. प्रत्येक कोरोनाबाधित किंवा संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल केल्यानंतर रुग्णवाहिकेचे निर्जंतुकीकरण करून पुढील रुग्ण रुग्णालयात दाखल करण्यासाठी तयार ठेवण्यात आली.
चौकट -
सोलापूर जिल्ह्यात ३५ रुग्णवाहिकेपैकी १० रुग्णवाहिका (एएलएस) व २५ रुग्णवाहिका (बीएलएस) आहेत. कोरोनाच्या काळात अतिगंभीर रुग्णांना व्हेंटिलेटर सपोर्ट व ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. रुग्णवाहिकेत वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्यामुळे रुग्णांवर तातडीने उपचार करण्यावर भर दिला.
- विठ्ठल बोडखे, विभागीय व्यवस्थापक, १०८ रुग्णवाहिका
गंभीर पेशंटला वाचविल्याचा अनुभव
मला १०८ कंट्रोल रूमवरून पहाटे ३च्या सुमारास फोन आला. एक रुग्ण अतिशय गंभीर असून, त्याला पुढील उपचारासाठी हॉस्पिटलला पाठवायचे आहे. आम्ही दहा मिनिटांत त्या ठिकाणी पोहोचलो. रुग्णवाहिकेवरील डॉ. सुनील वायदंडे यांनी रुग्णांची तपासणी करून तो रुग्ण गंभीर अवस्थेत असल्याने व्हेंटिलेटर सपोर्ट व ऑक्सिजन लागणार होता. त्याला अत्यावश्यक सुविधा दिल्याने त्याचा जीव वाचला.
- सुनील जाधव, रुग्णवाहिकाचालक, येरवडा, पुणे
----