राजकुमार सारोळे
सोलापूर : केगाव येथील संस्थात्मक क्वारंटाईनमधून १४ दिवस पूर्ण झालेल्यांना घरी सोडण्यासाठी अॅम्ब्युलन्स निघाली अन् शहरातील एका दुधवाल्याला घराजवळ सोडणार तोच कॉल आल्यामुळे सायरन वाजवित अॅम्ब्युलन्स पुन्हा माघारी वेगाने परतल्याची घटना घडली.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र, विद्यापीठ आणि सिंहगड कॉलेजच्या इमारतीत क्वारंटाइन करून ठेवले जात आहे. या ठिकाणी १४ दिवस या लोकांना निरीक्षणाखाली ठेवले जाते. त्यांच्यात काही लक्षणे आढळल्यास तातडीने सिव्हिल हॉस्पिटलकडे उपचारासाठी पाठविले जाते.
बुधवारी सकाळी क्वारंटाईनचा कालावधी संपलेल्यांना घरी सोडण्यासाठी केगावहून अॅम्ब्युलन्स निघाली. ही अॅम्ब्युलन्स शनिवारपेठेत आली असता कॉल आल्याने संबंधित व्यक्तीला घरी न सोडताच परतली. त्यामुळे याबाबत शहरात वेगवेगळी चर्चा सुरू झाली. अॅम्ब्युलन्स ज्या व्यक्तीला सोडण्यासाठी निघाली होती त्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना परत घेऊन अॅम्ब्युलन्स परतली.
दुधवाला होता आनंदात- अॅम्ब्युलन्स एका दुधवाल्या मामाला घरी सोडण्यासाठी निघाली होती. तेलंगी पाच्छापेठेतील किराणा दुकानदाराच्या घरी दूध पुरवित असल्याने त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. क्वारंटाईनचे १४ दिवस पूर्ण झाल्याने त्यांना बुधवारी घरी सोडण्यात येत होते. त्यामुळे दुधवालामामा आनंदात असतानाच अचानक कॉल आल्याने अॅम्ब्युलन्स दुधवाले मामांना घरी न सोडताच परतली. त्यामुळे शहरभर हा विषय चर्चेचा झाला आहे.
सिव्हिल हॉस्पिटलमधून कोणत्याही रुग्णाला सोडण्यात आलेले नाही. ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह येतो त्यांना आम्ही अॅडमिट करून घेतो. पॉझिटिव्ह नसेल तर क्वारंटाईनच्या ठिकाणी हलविले जाते.डॉ. औदुंबर मस्केअधीक्षक, सिव्हिल हॉस्पिटल