शितलकुमार कांबळे
सोलापूर : आपल्या कलेच्या जोरावर माणूस जगावर राज्य करू शकतो. याचे उदाहरण म्हणजे बार्शीतीलकलाकार महेश मस्के. पिंपळाच्या पानावर रेखाटलेले त्याचे चित्र अमेरिकेत पोहोचले. या कलाकाराच्या एका डोळ्याला बुबुळ नसल्याचे त्यांना कळाले. त्यांनी त्वरित पुण्यात येऊन महेशला ४० हजारांच्या दोन लेन्स तयार करून दिल्या. याचे कोणतेही पैसै त्यांनी घेतले नाही.
पिंपळाच्या पानावर कलाकृती तयार करणाऱ्या महेशच्या डाव्या डोळ्यामध्ये बुबुळ नाही. त्यामुळे त्याला दिसत नाही, तसेच एका डोळ्यात बुबुळ नसल्यामुळे ते खराब दिसत होते. एका डोळ्यानेच पाहात महेश पिंपळाच्या पानावर चित्र काढतो. महेशचे मित्र डॉक्टर असून, त्यांच्या माध्यमातून अमेरिकेतील सहा डॉक्टरांपर्यंत महेशची कलाकृती पोहोचली. त्यांनी महेशच्या कलेचे कौतुक होते. इथपर्यंत न थांबता त्यांनी महेशच्या डोळ्यात फायबर लेन्स बसविण्याचे ठरविले.
यापूर्वी महेशने अनेक ठिकाणी लेन्सबाबत चौकशी केली होती. डॉक्टरांनी त्यावेळी एका लेन्ससाठी ३० ते ४० हजार खर्च सांगितला होता. ते तयार करण्यासाठी दीड महिना वेळ लागणार होता; पण अमेरिकेच्या डॉक्टरांनी ४ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपासून संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत लेन्स तयार केली. ही लेन्स त्याच्या दुसऱ्या डोळ्यासारखी हुबेहूब तयार करण्यात आली. या लेन्समुळे दिसत नाही; पण साधारण मनुष्याप्रमाणे दोन्ही डोळे दिसतात. आपण एका डोळ्याने अंध आहोत हे पाहणाऱ्याला कळत नाही. अमेरिकेतील लिअम, समीरा, कॉर्टनी, ट्रेव्हर यांनी ही लेन्स तयार केली. यासाठी महेशचे मित्र डॉक्टर मोहसीन यांनी मदत केली.
---------
आपण कलाकृतीच्या माध्यमातून जगावर राज्य करू शकतो याची प्रचिती मला आली. एकही रुपया खर्च न करता मला लेन्स मिळाली. हे सर्व माझ्या कलाकृतीच्या माध्यमातून घडले. लहानपणापासूनच अपंगत्व अनुभवत आलो आहे. आज तो कमीपणा माझ्या कलाकृतीच्या माध्यमातून दूर झाला आहे. या कलेमुळेच थेट अमेरिकेतील डॉक्टरांनी पुण्यात येऊन माझी मदत केली, त्यांचा मी खूप आभारी आहे.
- महेश मस्के, चित्रकार
---------
भाषा नाही; पण मन समजले
मला अमेरिकेतील डॉक्टरांशी बोलता येत नव्हते; पण माझे वागणे, बोलणे व माझ्या हावभावातून त्यांना मला काय म्हणायचे आहे ते समजले. माझे डोळे हे खूप काही बोलून गेले. जाताना मी त्यांना त्यांची नावांची चित्रं पिंपळाच्या पानांवर रेखाटून दिली. याचा त्यांना खूप आनंद झाला. मदत केल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असल्याचे महेश मस्के यांनी सांगितले.
*********