सोलापूर : जीएसटी कायद्यामध्ये अनेक नवीन बदल करण्यात आले आहेत़ यामुळे हे नवीन बदल लक्षात ठेवणे गरजेचे आहे़ ज्यांचा जीएसटी नंबर रद्द करण्यात आला होता, अशांनाही आता अर्ज करून पुन्हा एकदा जीएसटी नंबर घेता येणार आहे. याचबरोबर आता जीएसटी रजिस्ट्रेशनसाठीची मर्यादा ४० लाखांपर्यंत करण्यात आल्याची माहिती अॅड. अमोल माने यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
इन्कम टॅक्स- सेल्स टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने जीएसटी अॅन्युअल रिटर्न-९ व रिसेन्ट अमेन्डमेंट या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली़ यावेळी सांगलीचे अॅड. अमोल माने यांनी जीएसटी कायद्यातील बदल या विषयावर ‘लोकमत’च्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. चारुदत्त शिरतोडे, असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. एस. एस. लोणी, सेके्रटरी नगरकर, श्रीनिवास पाध्ये होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अॅड़ माने पुढे म्हणाले, नवीन कायद्यानुसार जीएसटी रजिस्ट्रेशनची मर्यादा आता ४० लाख करण्यात आली आहे़ याचबरोबर कमोझिशनल स्कीमची मर्यादा ७५ लाखांवरून १.५ कोटीपर्यंत करण्यात आली आहे़ तर जीएसटीआर तीन बी प्रत्येक महिन्याच्या २० तारखेपर्यंत भरता येणार आहे़ अशी माहितीही यावेळी त्यांनी दिली. दरम्यान पहिल्या सत्रामध्ये पुण्याचे श्रीनिवास पाध्ये यांनी जीएसटी अॅन्युअल रिटर्न व रिसेंट अमेन्डमेंटवर मार्गदर्शन केले़