सोलापूर : पिशवीबंद वगळून दूध अनुदान योजनेला तीन महिन्यांची एप्रिलपर्यंत मुदतवाढ देताना अनुदानाचा प्रतिलिटर दोन रुपयांचा भार दूध संकलन करणाºया संस्थांवर टाकला आहे. शासन अनुदानापोटी तीन रुपये देणार आहे. या आदेशामुळे वाढीव प्रतिलिटर दोन रुपयांचा भार संस्था दूध उत्पादकांना देणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यात अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाल्याने आॅगस्टपासून पावडरीसाठी वापरल्या जाणाºया दुधासाठी शासनाने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले होते. आॅगस्ट ते आॅक्टोबर व नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीसाठी अनुदानाचे आदेश शासनाने काढले होते.
सलग सहा महिने अनुदान सुरू राहिल्यानंतर आता अनुदान मिळणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. कारण जागतिक बाजारपेठेत दूध पावडरीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दूध पावडरीचे दर वाढल्याने आता दूध खरेदीदार संस्थाच दरात वाढ करतील असे अपेक्षित होते; मात्र संस्था दूध खरेदी दर वाढवित नसल्याने शासनाने चर्चेनंतर मार्ग काढला आहे. दूध संकलन करणाºया संस्थांना आता गाईच्या दुधाला २० रुपयांऐवजी २२ रुपये द्यावे लागणार आहेत तर शासन ३:२ व ८:३ दुधाला तीन रुपये अनुदान देणार आहे. हे अनुदान एप्रिलपर्यंतच राहील असे शासन आदेशात म्हटले आहे.
चार महिन्यांचे अनुदान अडकले
- - शासनाकडून गाईच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपयांप्रमाणे आॅगस्ट, सप्टेंबर व आॅक्टोबर या तीन महिन्यांचे अनुदान मिळाले असल्याचे सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे सरव्यवस्थापक सतीश मुळे यांनी सांगितले. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी या चार महिन्यांचे अनुदान शासनाकडून अद्याप मिळाले नाही. फेब्रुवारी महिन्यात संस्थांनी २० रुपयांऐवजी २२ रुपये दर देण्याचा उल्लेख आदेशात नसल्याने शेतकºयांना दुधापोटी पैसे दिले नसल्याचे सांगण्यात आले.
- - ८ मार्चच्या अनुदान मुदतवाढ आदेशात शासन गाईच्या दुधाला प्रतिलिटर तीन रुपये अनुदान देणार असल्याचे म्हटले आहे; मात्र संस्थांनी दोन रुपयांची वाढ द्यावी असे म्हटलेले नाही; मात्र संस्थांसोबतच्या चर्चेत संस्थांनी गाईच्या दुधाला २० रुपयांऐवजी २२ रुपये द्यावेत असे ठरले असल्याचे सांगण्यात आले. आता संस्था ठरल्याप्रमाणे प्रतिलिटर २२ रुपये देणार की पूर्वीप्रमाणे २० रुपये देणार? हे दूध उत्पादकांनी निदर्शनाला आणल्यानंतर समजणार आहे.