विलास जळकोटकर, सोलापूर: वडिलांच्या मृत्यूनंतर वारस नोंद लावून देतो म्हणून भू मापन कार्यालयातील एजंट (खासगी इसम) तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ लाचलूचपत प्रतिबंधक पथकाच्या सापळ्यात अडकला. शुक्रवारी सायंकाळी इनामदार हॉटेलसमोरील रोडवर ही कारवाई करण्यात आली. यातील तक्रारदाराच्या वडिलांच्या निधनामुळे तक्रारदारांसह त्यांच्या आई, भावांची वारस नोंद करण्यासाठी नगर भूमापन कार्यालयात अर्ज केला होता. तक्रारदार कार्यालयास हेलपाटे मारुन नोंदीसाठी पाठपुरावा करीत होता.
या कार्यालयात खासगी एजंट म्हणून काम करणाऱ्या अ. रऊफ म. शरीफ शेख (रा. ३९६, न्यू पाच्छा पेठ, लालबहाद्दूर शास्त्री हायस्कूलजवळ, सोलापूर) याने नोंदीचे काम करुन देण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागितली. दरम्यान तक्रारदाराने लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सापळा लावण्यात आला. शुक्रवारी ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून इनामदार हॉटेलसमोरील रोडवर ३ हजाराची रक्कम स्वीकारताना पथकाने अटक केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे, उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शिरीषकुमार सोनवणे, श्रीराम घुगे, रवी हाटखिळे, श्याम सुरवसे यांनी केली.