सोलापूर : जिल्हा कृषि महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रत्येक यंत्रणेने योगदान द्यावे, अशा सूचना आयोजन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या. दरम्यान, ५ ते ९ मार्च दरम्यान जिल्हा कृषि महोत्सव होत असून, त्याच्या नियोजनाच्या अनुषंगाने त्यांनी या सूचना दिल्या. या प्रदर्शनाला राज्यभरातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित राहणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
कृषिविषयक तंत्रज्ञानाचा प्रसार, शासकीय योजनांची माहिती देणे, शेतकरी –शास्त्रज्ञ संशोधन – विस्तार प्रक्रिया व विपणन साखळी निर्माण करणे, शेतकरीउत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री शृंखला आदि यामहोत्सव आयोजनाचे हेतू आहेत. कृषि महोत्सव नियोजनासंदर्भात आज झालेल्या प्राथमिक बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे, उपविभागीय कृषि अधिकारी जयवंत कवडे, आत्माचे प्रकल्प संचालक मदन मुकणे, जिल्हा परिषद कृषि विकास अधिकारी विवेक कुंभार आदिंसह समितीचे सदस्य, कृषि विज्ञान केंद्राचे संशोधक, महाबीज, जिल्हा अग्रणी बँक, माविम, कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीत विविध समित्यांचे गठन व सदस्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. कृषि तसेच अन्य विभागांतीलनाविन्यपूर्ण व महत्त्वाच्या योजना यांच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी व्यासपीठउपलब्ध करून देऊन प्रदर्शन मांडणीपासून यशस्वी करण्यापर्यंतची प्रक्रिया याबाबतचे नियोजन करण्यात आले.
लक्ष्मी विष्णू मिल मैदान येथे होणाऱ्या या महोत्सवात कृषिप्रदर्शन, विविध परिसंवाद, चर्चासत्रे, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री सुविधा, विक्रेता खरेदीदार संमेलन यांच्यासह जिल्ह्यातील कृषि व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले शेतकरी व पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.