सोलापूर : पासपोर्ट व्हेरीफीकेशन साठी १५०० रुपये लाच मागणाऱ्या सहाय्यक पोलिस निरीक्षक टुर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स चालकास सोलापूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.
रविंद्र गणपत शिंदे, वय ५७ वर्षे व्यवसाय (सहायक पोलीस उपनिरीक्षक, जेलरोड पोलीस ठाणे सोलापूर शहर), सलाहुद्दीन लायक अली मुल्ला (वय ४६ वर्षे, व्यवसाय टुर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स चालक) या दोघांना ताब्यात घेतले आहे.
तक्रारदार यांनी पासपोर्ट मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला असून सदरचा अर्ज व्हेरीफिकेशन व पत्ता पडताळणी कामी जेलरोड पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे पडताळणी होऊन पुढील कार्यवाही होण्यासाठी प्राप्त झाला होता. तक्रारदार हे पासपोर्टचे अनुषंगाने पाठपुरावा करीत असतांना यातील लोकसेवक शिंदे यांना भेटले असता त्यांनी तक्रारदार यांना पासपोर्टचे अनुषंगाने पत्त्याबाबतची पडताळणी करुन पुढील कार्यवाही करण्याकामी १५०० रुपये लाचेची मागणी केली व सदर लाच रक्कम यातील आरोपी क्र. ०२ खाजगी इसम मुल्ला यांचे मोबाईल क्रमांकाचे फोन पे खात्यावर पाठविण्याबाबत सांगितले व यातील आरोपी क्र.०२ मुल्ला यांनी त्यास संमती दिल्याचे पडताळणीत निष्पन्न झाल्याने यातील आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले असून सविस्तर लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
ही लाचलुचपत प्रतिबंधक सोलापूर विभागाचे पोलिस निरीक्षक उमाकांत महाडीक, पोलीस अंमलदार- घुगे, घाडगे, जानराव, किणगी, सोनवणे, सण्णके, पकाले, सुरवसे यांनी केली.