काशिनाथ वाघमारे
सोलापूर : गावातील विठ्ठल मंदिरातील सप्ताहाचा कार्यक्रम संपवून घरी पायी निघालेल्या वृद्ध महिलेला भरधाव जीपची धडक बसली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या वृद्धेचा उपचारापूर्वी मृत्यू झाला.
गंगुबाई उत्तम मेनकुदळे (वय ६२, रा.अंबाड) असे मरण पावलेल्या वृद्धेचे नाव असून हा अपघात गुरुवार, ४ एप्रिल रोजी रात्री ११:१५ वा टेंभुर्णी - कुर्डूवाडी रोडवर अंबाड (ता.माढा) येथील शिवारात झाला. याबाबत उमेश महालिंग मेनकुदळे (रा.अंबाड, ता.माढा) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी उमेश मेनकुदळे यांची आजी गंगुबाई मेनकुदळे ही गावात विठ्ठल मंदिरात सुरू असलेल्या सप्ताहासाठी गेली होती. रात्री १०:३० वा सप्ताह संपला. सप्ताहासाठी गेलेले लोक घरी गेले, परंतु आजी आली नव्हती. दरम्यान, रात्री ११.१५ वाजता फिर्यादीच्या भावकीतील दीपक पाटील यांनी फोनवर संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. भरधाव वेगातील जीप (एम.एच. ४५/ ए. ९१०१)ने धडक दिल्याने आजी गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडली. लागलीच फिर्यादी नातवाने घटनास्थळाकडे धाव घेतली. त्याच जीपमधून आजीला कुर्डूवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेल्याचे सांगितले गेले.
कुर्डूवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्यानंतर डाॅक्टरांनी विचारले असता, ती वृद्ध महिला ही उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी जीप चालक विश्वजीत नागेश ताकमोगे (रा.कव्हे ता.माढा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.