सोलापूर : इंधन बचावासाठी ती पूरक असल्याने लोकांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांबद्दल आकर्षण वाढत असताना सोलापुरातील रामलाल चौक-भैय्या चौक रोडवर मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास इलेक्ट्रिक मोपेड वाहनानं पेट घेतला आणि संबंध रस्त्यावर धूर पसरला. तातडीने अग्निशामक दलाच्या बंबास पाचारण करुन आग आटोक्यात आणली गेली. यामध्ये वाहनाचे १ लाख २५ हजाराचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मोपेड वाहन दुपारी साडेतीनच्या सुमारास रामलाल चौकातून भैय्या चौकाकडे जात होते. अचानक गाडीमधून धूर येऊ लागला. चालकाने वाहन जागेवरच थांबवले व बाजूला झाला. धूर वाढत गेला. गाडीने पेट घेतला. आजूबाजूला जमलेल्या गर्दीतील एकानं लागलीच अग्निशामक दलास खबर दिली. ३:४० वाजता सायरन वाजवत बंद दाखल झाला. तातडीने जवळपास २०० लिटर पाण्याचा फवारा मारल्यानंतर आग आटोक्यात आणली गेली. यासाठी फायरमन संजय जगताप, सिद्धाराम आडगळे, चालक विश्वनाथ कालते यांनी प्रसंगाधवान राखून आग आटोक्यात आणली.बॅटरी गरम झाली म्हणून पेट घेतला
संबंधीत मोपेड इलेक्ट्रिक वाहन हे बॅटरीवर चालते. यातील बॅटरी गरम झाल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात आले. सदर वाहनाची किंमत १ लाख २० हजार आणि डिकीमधील पाच हजाराचे साहित्य असा १ लाख २५ हजाराचे नुकसान झाल्याचे वाहनचालक शाहबाज शेख (रा. ५४ रेल्वेलाईन्स, सोलापूर) यांनी सांगितले.