विलास जळकोटकर
सोलापूर : वराह पालनासाठी भाडेतत्वावर घेतलेल्या जागेत मयत व्यक्तीच्या नावे बनावट प्रतिज्ञापत्र तयार करुन वीज कनेक्शन घेऊन मालकाची व महावितरणची फसवणूक केल्या प्रकरणी मंगळवारी (२ मे) दोघांविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंदला आहे. शास्त्रीनगर परिसरात २०१४ पासून आजतागायत ही फसवणुकीची घटना घडली.
या प्रकरणी व्यावसायिक असलेले विजय शंकर घोडके ( रा. वराह सोसायटी, शास्त्रीनगर) हे सोसायटीचे सचिव आहेत. यातील युन्नूस मकबूल सय्यद व शरद कुमार घोडके (रा. सोलापूर) यांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी मयत असलेले कै. कुमार राम घोडके यांच्या नावाचे बनावट प्रतिज्ञापत्र करुन ते महावितरणकडे सादर केले आणि २७ मार्च २०१४ पासून वीज कनेक्शन घेतले. हे बाब सोसायटी सचिव असलेले फिर्यादी विजय यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वरील दोघांविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी दोघांविरुद्ध भा. दं. वि. ४२० कलमान्वये गुन्हा नोंदला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मुल्ला करीत आहेत.