सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उत्तुंग अशा कर्तुत्वाची साक्ष देणारे शस्त्रास्त्रे प्रदर्शन शहरात भरले आहे. हत्तीच्या कातड्याची ढाल, साडेतीनशे वर्षांपूर्वीची तलवार, भाले, दांडपट्टा असे अनेक शस्त्र या प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत. शहरातील विद्यार्थी, तरुण, इतिहासाची आवड असणारे नागरिक या प्रदर्शनाला भेट देत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्या कडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शस्त्र प्रदर्शन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन 15 आणि 16 फेब्रुवारी रोजी सुरू असणार आहे. मोरारजी पेठ येथील पोलीस कल्याण केंद्र येथे हे प्रदर्शन भरले आहे. या प्रदर्शनात पाचशे विविध प्रकारचे शस्त्रांचा समावेश आहे. एकविरा आई मर्दानी आखाडा शस्त्र संग्रहालय माधवराव देशमुख यांनी हे प्रदर्शन सोलापुरात आणले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांनी दिली.
या प्रदर्शनात साडेतीनशे वर्षांपूर्वी वापरली जाणारी अनेक प्रकारची शस्त्रे आहेत. प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार 15 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या हस्ते झाले.
प्रदर्शनात ही शस्त्रे मिळतील पाहायलादांडपट्टा, समशेर, मराठा तलवार, राजपूत तलवार, मोगल तलवार, इंग्रजकालीन तलवार, मराठा कट्यार, मोगल कट्यार, खांडा तलवार, खंजीर, बिचवा, जांभिया, कवच, दिवा, मशाल, कुलूप, तोड्याची पिस्तूल, लोखंडी ढाल, दगडी गोळे, गोफण गोळे आदि शस्त्रांचा या प्रदर्शनात समावेश आहे.