सोलापूर : बहुजाती, बहुभाषा अन बहुविध सण उत्सवप्रिय सोलापुरात गुरुवारी स्वामी समर्थांचा प्रकट दिन विविध उपक्रमांनी पार पडला. अक्कलकोटमध्ये अन्नछत्र मंडळाच्या वतीने पाळणा गुलालाने प्रकट दिन पार पडला तर सोलापूर शहरात उद्धवनगरमध्ये एका भक्ताने स्वखर्चातून मूर्ती स्थापन केली. सुंदरम नगरमध्ये मंदिराचा गाभारा द्राक्षांच्या आरासाने फुलला. हत्तुरेवस्तीत अडीच तास कीर्तन चालले तर कोनापुरे चाळीतील स्वामी भक्तांनी तीन तासात दोन क्विंटल महाप्रसाद बनवून भक्तांच्या मुखात घातला.
सोलापूर जिल्ह्यात शहरात आणि ग्रामीण भागात स्वामी समर्थांचा प्रकट दिन दरवर्षी विविध उपक्रमांनी साजरा केला जाताे. विजापूर रोडवर सुंदरम नगरमध्ये यंदा माजी अध्यक्ष दिलीप राऊत यांनी नान्नज येथून शंभर किलो द्राक्ष आणली. स्वामी समर्थांचा गाभारा यंदा द्राक्षांनी सजला. अक्कलकोटमध्ये अनच्छत्र मंडळाच्या वतीने पाळणा कार्यक्रम पार पडला. सोलापूर शहरात आसरा सोसायटीत भैरवनाथ स्वामी समर्थ मंदिरात महिलांनी सामुहीक पारायण केले अन सायंकाळी दीड किलो मीटर वाजत-गाजत पालखी सोहळा काढला.तसेच कोनापुरे चाळीत बाबा करगुळे या सामाजिक कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली चक्क तीन तासात दोन टन महाप्राद बनवून तो भाविकांना वाटला. विजापूर रोडवर उद्धव नगर येथे मनोजकुमार अलकुंटे हे गेली १४ वर्षे स्वामी समर्थांच्या प्रितिमेचे पूजन करुन प्रकट दिन पार पाडायचे. त्यांनी तेंव्हापासून पैसे बचत करीत यंदा जमलेल्या स्वत:च्या ५१ हजारातून पंढरपुरात ११ दिवसात स्वामींची मूर्ती बनवून घेतली. ती आज स्थापन करुन स्वत:मधील भक्ती व्यक्त केली. तसेच दिवसभरात १४ तास भजन चालले.