महाराष्ट्रात जिथे पाऊस पडतो तो भूभाग तीव्र उताराचा आहे. त्यामुळे बारा महिने पाणी वाहून नेणारे व पाणी उपलब्ध असणारे पाण्याचे नैसर्गिक स्रोत (नद्या, नाले, ओढे, सरोवरे) नाहीत. शिवाय मोसमी पाऊस तोही बिनभरवशाचा खंडित व मर्यादित कालावधीत (चार महिने) पडतो. हे सर्व माहीत असूनही दोन वर्षे पाणी पुरेल या पद्धतीने पाण्याचा उपयोग करण्याचे नियोजन आपल्याकडे केले जात नाही.
आपल्याकडे प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना आहेत, त्याची देखभाल केली जात नाही. अशाच योजना करून जास्तीत जास्त गावे अशा योजनेखाली आणण्याचा व नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जात नाही. सांगोला तालुक्यासाठी ८२ गावांची पाणीपुरवठा योजना योग्य पद्धतीने चालू आहेत. अशा अनेक योजना केल्या आहेत त्याच्या देखभालीसाठी जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे.
प्रत्येक गावासाठी स्वतंत्र योजना करणे अव्यवहार्य आहे तरीही तसेच केले जात आहे तेव्हा सोलापूर नगरासाठी नळ पाणीपुरवठा करतेवेळी धरणातून पाणी घेऊन येणारी मोठी जलवाहिनी ज्या गावातून येते त्या गावांना पाणीपुरवठा करण्याचा विचार केला नाही. या खर्चाची वसुली लाभार्थी व्यक्तीकडून वाजवी दराने केली जात नाही. त्यामुळे अन्य वंचित गावांना प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आर्थिक अडचणी येतात. थोडक्यात दुष्काळावर ठोस उपाययोजना असूनही त्यांना प्रत्यक्षात योजनेस अपयश आले ही स्वयंसिद्ध बाब आहे. भारतात बेभरवशाचा मोसमी पाऊस पडतो तोही विखरुन पडतो. ठराविक कालावधीत पडतो. यामुळे बारा महिने पाणी वाहणाºया नद्या व स्रोत नाहीत हे वर नमूद केले आहेच.
याबरोबरच पाणी खात्रीने उपलब्ध होत नसल्यामुळे पाणीटंचाई निर्माण होते म्हणजे दर दोन-तीन वर्षांनी कोरडा दुष्काळ अन्न व पाणी टंचाई निर्माण होते. सर्व यंत्रणा व साधने यासाठी गुंतून जाते हे अनुभवयाला मिळत आहे. हा टंचाई काळ आॅक्टोबरमध्येच समजून येतो. तरीही मार्चपासून याचा त्रास जाणवल्याशिवाय कोणतीही यंत्रणा हलत नाही. ऊस पीक जळून किती पाणी वाया जाते व तिहेरी नुकसान करते याचा आढावा घेणे आवश्यक आहे. तरीही याची माहिती घेतली जात नाही आणि उपाययोजना केली जात नाही हे अनुभवयाला मिळते आहे. तेव्हा यावर मात करण्यासाठी पावसाद्वारे पडणारे पाणी साठवणे व उपलब्ध करणे, वितरण करणे यासाठी किमान दोन वर्षांची गरज समोर ठेवून नियोजन करण्याचे धोरण स्वीकारले पाहिजे. माणसासाठी धान्य उत्पादन आणि साठवण करतो त्याप्रमाणे पाणीमात्रासाठी चारा उत्पादन साठवणूक व उपलब्धता याचेही नियोजन गावोगावी व्हायला पाहिजे.
असे केले तर कोरड्या दुष्काळी परिस्थितीवर मात करणे शक्य होईल. यासाठी दरवर्षी पाण्याअभावी ऊस किती जळतो याची माहिती गोळा केली पाहिजे. गावातील गरजेप्रमाणे धान्य व चारा गावातच उत्पादित झाला पाहिजे. तिथेच साठवला पाहिजे. गावातील गरजेप्रमाणे धान्य व चारा गावातच उत्पादित झाला पाहिजे व उपलब्ध करून दिला पाहिजे. म्हणजे प्रत्येक गरजवंताला वितरित करणे शक्य होईल. ही सर्व जबाबदारी स्थानिक स्वराज संस्थांकडे दिली पाहिजे. यासाठी आंतरजाल ई वाहिनी संगणकाचा उपयोग करावा लागेल. नमुना १२ भरून घेतला पाहिजे. मालमत्ता प्रपत्र नमुना सुधारित करुन कुटुंबप्रमुख व सदस्यांची माहितीपण गोळा केली पाहिजे. म्हणजे टंचाईकाळात पाणी, अन्न व चारा उपलब्ध करून देणे व वितरित करणे सहज शक्य होईल. असे केल्याने कोणालाही गाव लागणार नाही. यासंबंधी प्रसारमाध्यमांनी जागृती केली पाहिजे. जाणकारांनी पुढाकार घेतला पाहिजे. यावर चिंतन व्हावे एवढेच.- दिलीप सहस्रबुद्धे(लेखक माजी शिक्षण उपसंचालक आहेत)