आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १८ : पंढरपूरच्या विठ्ठल - रूक्मिणी मंदिर समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. अतुल भोसले व इतर सदस्यांबरोबर माझी चर्चा झालेली नाही, पण पूर्वजांची पुण्याई म्हणून मंदिर समितीवर काम करण्याची संधी मिळाली, झालं गेलं विसरून जाऊ आणि कामाला लागू; पण कोणाचा आक्षेप असेल तर अध्यक्षांच्या गळ्यात आम्ही तुळशी माळ घाल,ू अशी भूमिका पंढरपूरच्या विठ्ठल—रूक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. गहिनीनाथ महाराज यांनी मंगळवारी येथे मांडली. विठ्ठल—रखुमाई मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. गहिनीनाथ महाराज यांनी मंगळवारी सकाळी ‘लोकमत’ला सदिच्छा भेट दिली. यावेळी संवाद साधताना ह.भ.प. गहिनीनाथ महाराज यांनी मंदिर समितीवर वारकरी नसलेल्या सदस्य निवडीच्या पात्र -अपात्रेविषयी ज्या चर्चा सुरू आहेत, त्याविषयी आपले मत मांडले. तुळशी माळ घातल्यावर आहार, विहार सात्विक आणि चांगला होतो. मंदिर समितीचा अध्यक्ष सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्ती असेल तर प्रभावीपणे काम होते. शासकीय अधिकाऱ्यांकडून त्यांना कामे करुन घेता येतात. नवीन अध्यक्षांची माझी भेट झालेली नाही. त्यामुळे इतक्यात मी त्यांच्यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करू शकणार नाही; पण राजकारणात विचारप्रणाली, जीवन आणि कर्म यावरून व्यक्ती यशस्वी होते. डॉ. भोसले यांचे सामाजिक काम मोठे आहे; तरही आम्ही अंध होऊन वाहत जाणार नाही. आम्ही डोळस होऊन त्यांना तुळशी माळ घालू असे स्पष्टीकरण केले.मंदिर समितीच्या मर्यादेविषयी बोलताना ते म्हणाले की, पंढरपूर वारकऱ्यांचे वैभव आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला सुविधा मिळाली पाहिजे ही भावना आहे. पण मंदिर समिती वाळवंटात सुधारणा करू शकत नाही. वारकरी केंद्रबिंदू मानून वारकऱ्यांना सोयीसुविधा देण्यासाठी समिती कटिबद्द आहे. दर्शनबारीत आणखी काय सुविधा देता येतील, यावर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. अन्नछत्राची सर्वत्र व्यवस्था करता येत नाही. तरीही शासन व नगरपालिकेच्या सहकार्यातून अन्नछत्र, सुलभ शौचालय आदी सुविधा वाढविण्याचा प्रयत्न राहिल, असे ते म्हणाले. -----------------संतपीठाची स्थापना...पंढरीत अनेक किर्तन, प्रवचनकार येतात. त्यांना येथील संताची महती सांगण्याची गरज नाही. पण जे अभ्यासक आहेत, त्यांना पंढरीचा महिमा व इतिहासाचा अभ्यास करता यावा म्हणून ६५ एकर जागेत जगदगुरू श्री तुकाराम महाराज किंवा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या नावे संतपीठ स्थापन करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे ह. भ. प. गहिनीनाथ महाराज म्हणाले. पंढरपुरात परराज्यातील भाविक, अभ्यासक येतात. त्यांना माहिती देण्यासाठी संत साहित्याचे ग्रंथालय उभे करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
...तर विठ्ठल - रूक्मिणी मंदिर समिती अध्यक्षांच्या गळ्यात तुळशीमाळ घालू ! गहिनीनाथ महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 2:36 PM