आप्पासाहेब पाटील, सोलापूर : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी जिल्हा परिषद सोलापूर येथील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो महिला कर्मचारी सहभागी झाल्या होत्या. थाळी नाद करीत राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचा अंगणवाडी सेविका, कर्मचारी यांनी प्रयत्न केला.
दरम्यान, दुपारी चार हुतात्मा पुतळा येथून निघालेला मोर्चा सिध्देश्वर मंदीर-पासपोर्ट कार्यालय- सिध्देश्वर प्रशालेमार्गे जिल्हा परिषदेच्या पूनम गेटपर्यंत पोहोचला. या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या सभेत विविध मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी शासनाच्या धोरणावर जोरदार टिका केली. अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढ, पेन्शन सुरू करणे आदी विविध प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडून सातत्याने आश्वासन देण्यात येते. मध्यंतरी मागण्या सोडविण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती, ती बैठक अचानक रद्द करण्यात आली. वारंवार आश्वासन देऊनही मागण्यांची पुर्तता न करणाऱ्या शासनाचे लक्ष वेधण्याठी थाळी नाद आंदोलन करण्यात आल्याचे सुर्यमनी गायकवाड यांनी सांगितले.