मनोज आणि त्यांच्या पत्नी ज्योती कुलकर्णी हे दाम्पत्य करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशाला येथील कोविड सेंटरमधील कोरोनाबाधित रुग्णांना वेळच्यावेळी चांगले जेवण, नाश्ता, चहा, काढा देतात. यासाठी कुलकर्णी दाम्पत्य रोज पहाटे ५ वाजल्यापासून कामाला लागतात. सकाळी ७ वाजल्यापासून चहा आणि नाश्ता देण्याचे काम सुरू केले जाते.
मनोज कुलकर्णी बोलताना म्हणाले, कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णाच्या मनात भीती निर्माण होते. त्यात त्यांना घरच्याप्रमाणे जेवणासह नाश्ता व इतर सुविधा मिळाव्यात म्हणून पहाटे ५ वाजल्यापासून पत्नी ज्योती व घरातील सदस्य यांची तयारी सुरू असते. आम्हाला ५ महिन्यांचे बाळ आहे. त्याला पाहून सर्व कामे केली जातात. यात पैसे मिळतात; पण तेवढाच आनंदही मिळतो.
मनोज कुलकर्णी यांचे शिक्षण १२ वीपर्यंत झाले आहे. पुढे शिक्षण न करता आणि नोकरीचा विचारही न करता त्यांनी व्यवसाय सुरू केला. घरातच सुरू केलेली खानावळ त्यांची करमाळकरांच्या पसंतीला उतरली. कोविड सुरू झाला तेव्हा सरकारच्या आवाहनानुसार सर्व जण घरात होते. अशा स्थितीत कुलकर्णी मात्र ‘कोविड योद्ध्या’प्रमाणे रुग्णांना सेवा देण्यासाठी लढत होते. आजही ते त्याच उमेदीने सेवा देत आहेत.
----
सकाळी मी भाजीपाला आणून देतो. त्यानंतर चहा आणि नाश्ता घेऊन जातो. तोपर्यंत जेवण तयार झालेले असते. पुन्हा डबे घेऊन जातो. आधी सर्व जेवण दुचाकीवर पोहोच करत होतो. मात्र, आता डबे जास्त असल्याने रिक्षात डबे घेऊन जातो. प्रशासन रुग्णांसाठी आपल्या जीवाचे रान करत आहे. आपणही आपल्या पद्धतीने प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याची गरज आहे. या कामातून आपल्याला समाधान मिळते.
- मनोज कुलकर्णी
फोटो ओळी : कोविड सेंटरमध्ये बाधित रुग्णांना जेवण देताना कुलकर्णी पती-पत्नी.