वैराग : अतिद्राक्ष खाणे एका २२ वर्षीय युवकाच्या अंगलट आले आहे. यामुळे त्या युवकाचा मृत्यू झाला असून, त्यातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केला आहे.
मंदार भाऊराव मोरे (रा. वैराग, ता. बार्शी) असे त्या युवकाचे नाव असून, हा प्रकार १८ फेब्रुवारी रोजी घडला.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार वैराग येथील भाऊराव मोरे हे स्वत:च्या कुटुंबासमवेत नांदणी (ता. बार्शी) येथे नातेवाइकाकडे द्राक्ष खाण्यासाठी गेले होते. सर्वजण द्राक्ष खाऊन सायंकाळी वैराग येथे घरी परतले. त्यानंतर मंदार याला मळमळ होऊन उलटीचा त्रास सुरू झाला. त्याला तत्काळ बार्शी येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविले. दरम्यान, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर आलेल्या शवविच्छेदन अहवालात विषबाधेमुळे मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.
मंदार हा पुणे येथे खाजगी कंपनीत नोकरी करीत होता. दोन दिवसांची सुटी घेऊन तो गावी आला होता. नातेवाइकांच्या आग्रहाखातर द्राक्ष खाण्यासाठी नांदणी येथे सहकुटुंब गेला. मात्र, तेथे अतिप्रमाणात द्राक्षे खाल्ल्यानंतर त्यास त्रास सुरू झाला. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.
---
फोटो - २१ मंदार मोरे