जाता जाता सहज लक्ष गेलं.. गर्दीत काहीतरी गोंधळ सुरू होता. पाहिल्याशिवाय पुढं कसं जावं वाटेल हो! आपला काही संबंध नसला तरी गर्दी दिसली की माणसाचे पाय वळतातच तिकडे! पलीकडे एक छोटेखानी मंडप टाकून वारकºयांना खिचडी वाटप करण्यात येत होतं. कुणी एक ‘बगळाछाप’ व्यक्ती आपल्या ‘शुभ’हस्ते खिचडीचे वाटप करीत होता तर समोर लांबलचक रांग होती. अर्थातच त्याचं लक्ष घेणाºयाच्या हाताकडं कमी अन् बाजूच्या फोटोग्राफरकडं अधिक होतं. कुणीतरी एक भुकेला रांगेत घुसला आणि कळवळून खिचडीची मागणी केली. मग काय.! सामाजिक कार्य करणारे काही कार्यकर्ते त्या गरिबांवर तुटून पडले. या माराने त्याचं इतकं पोट भरलं की तो भूक विसरून गेला होता. पलीकडे सामाजिक उपक्रम सुरूच होता.
कसं असतं बघा, रांगेत मध्येच घुसला हे त्याचं चुकलंच, पण त्यासाठी एवढी शिक्षा? शेवटी तोही भुकेलाच होता ना! सामाजिक उपक्रमाचे लेबल लावणारे सामाजिक बांधिलकीशी बांधील राहतीलच असे नाही. कुणी फोटोसाठी करतं तर कुणी लोकांना दाखवण्यासाठी करतं. मनापासून सेवाभाव जपणारी माणसंही अनेक आहेत या दुनियादारीत. कसलाही गाजावाजा न करता ही मंडळी समाजाचं देणं फेडत असतात. पंढरीच्या वारीच्या काळात हमखास त्यांचे दर्शन होत असतं. वर्तमानपत्रात फोटो यावा या हेतूने भाविकांची सेवा केल्याचे दाखवणारे जसे भेटतात तसे मोठ्या श्रद्धेनं भाविकांसाठी जे करता येईल तेवढे करणारेही भेटतात. त्यांच्यापैकीच एक शिवाजीराव कोळी. दशमीच्या दिवशी सकाळपासून रात्री एकादशी सुरू होईपर्यंत भाविकांना ते मिष्टान्न भोजन देत असतात. कित्येक वर्षे लोटली, भले आणि बुरेही दिवस आले पण यात खंड नाही पडला.एवढ्या वर्षात त्यांनी एक फोटोही नाही काढून घेतला की कुठं याचा गाजावाजाही नाही केला.
दुनियादारीत सगळंच काही वाईट असत नाही, चांगली माणसं नक्कीच आहेत. काही मोजक्या ढोंगी अन् लबाड माणसांमुळे ती काहीशी झाकोळली जातात एवढंच! ढोंग तर सगळीकडेच असते पण ते तीर्थक्षेत्री काहीसं अधिक दिसतं. अंध, अपंग, एवढंच! कुष्ठरोगी, बेवारस अशी सगळी मंडळी तीर्थक्षेत्री जमा झालेली असतात अन् मग त्यांच्या मार्गाने पुण्य कमविण्याचा मार्ग शोधला जातो. भुकेलेल्यांच्या मुखात दोन घास घालणं हे खरंच चांगलं काम आहे. दान कुठलंही असो ते श्रेष्ठच! त्यात अन्नदान अनमोल. दान हे नेहमी झाकल्या मुठीनं असावं म्हणतात..उजव्या हातानं दिलं तर डाव्या हाताला कळू नये. ज्यांच्याकडे दातृत्व असतं ते नेमकं हेच करतात नाहीतर आहेतच की चिपटंभर देऊन पायलीचा ढोल वाजवणारे नमुने!
भुकेल्याच्या मुखात दोन घास घालणे यासारखं दुसरं सत्कर्म नक्कीच नाही. आपल्या ताटातली अर्धा भाकरी दुसºयाला द्यावी ही आपली संस्कृती. ज्यांच्याकडे आहे त्यांनी नाही वाल्यांना द्यायलाय हवं पण या देण्यात स्वार्थ नव्हे, समर्पणाचा भावतरी असायलाच हवा! नसतो असं नाही पण असतोच असंही नाही हो! केरळमध्ये जलप्रलय झाला तेव्हा कर्नाटकच्या एका बगळ्यानं नाही का बिस्कीटांचे पुढे पूरग्रस्तांच्या अंगावर भिरकावले. कुत्र्याच्या दिशेनं तुकडा फेकतात तसं! पंढरीत विविध ठिकाणी नेहमी असे अन्नदानाचे कार्यक्रम चालतात.
इथं अंध, अपंग, कुष्ठरोगी, भिकारी यांची संख्या इतर शहरापेक्षा अधिक आहे. या मंडळींना ओळीत बसविण्यात येते आणि भजन करायला सांगितले जाते त्यानंतर त्यांना बसल्या जागेवरच अन्नदान करण्यात येते. हे सगळे ठीक आहे पण अन्नदानातून पुण्य पदरात पाडू इच्छिणारे खरंच पुण्य मिळवतात की नाही हे सांगणं तसं कठीणच बरं का! म्हणजे काय होतं पहा, अन्नदान करणारा हा असतो कुणीतरी मुंबईचा मोठा शेठजी... श्रीमंतीच्या मस्तीतला! अर्थात सगळे तसेच नसले तरी माझा एक अनुभव फार काही सांगून जातो. अर्थात अनेकांनाही हा नमुना अनुभवायला मिळालाही असेल म्हणा! या दुनियादारीत कोण कसा वागेल हे खरंच नाही सांगता येत राव ! मुंबईच्या एका धनिकाला असंच अन्नदान करण्याची बुध्दी झाली. नव्हे, लहरच आली म्हणा ना! त्याचे कुटुंब वातानुकूलित गाडीतून उतरलं, मागे नोकर चाकरांचीही एक गाडी. दरम्यान भुकेल्या मंडळींचं भजन भुकेपेक्षाही अधिक झालेलं. ‘शेठ’ येईपर्यंत तर त्यांना ते करावेच लागणार होतं.
भुकेची आग पोटात भडकल्यावर कशाचं काय हो? पण करावं लागतंच ना..., सक्तीची भक्ती! हा मुंबईचा शेठ कुटुंबासह गाडीतून खाली उतरला, मागच्या गाडीतले नोकरही? एकाने त्याच्या डोक्यावर छत्री धरलेली तर दुसºयाच्या हातात भाकरीची टोपली. हे ‘शेठ’ महोदय पंगतीत घुसले आणि उभ्यानंच भाकरी चक्क भिरकावू लागले. भुकेले बिचारे कसरत करून भाकरी पकडू लागले. कुणाच्या हातात येत होती तर कधी मातीत पडलेली भाकरी उचलावी लागत होती. भाकरी देताना थोडंसं वाकतही नव्हता आणि पृथ्वीच्या गोलासारखं त्याचं पोट त्याला वाकूही देत नव्हतं.
पाठीत कणा होता की लोखंडी रॉड होता तोच जाणे! कुत्र्याला तुकडा टाकतानाही कुणी असं टाकत नाही पण हा भाकरी फेकून म्हणे अन्नदान करीत होता अन् मनात पुण्य मिळण्याचे समाधान मानत होता. हे ‘अन्नदान’ होतं की अन्नफेक ? की माज श्रीमंतीचा? एकानं भाकरी मातीत पडू नये म्हणून थेट टोपलीत हात घातला पण शेठजीच्या नोकराने त्याच्या पाठीत लाथ घातली. रागावलेला हा ‘शेठ’ आपल्या बायकोकडे पहात म्हणाला,‘ये कुत्ते कभी नही सुधरेंगे! अरेरे! काय हे? शेठजी, तुम क्या जानो, कुत्ता तो वफादार होता है. पाहणाºयांना मात्र दिसलं.., नक्की कोण कुत्ता’ अन् कोण गधा?
-अशोक गोडगे (लेखक हे साहित्यिक आहेत)