सोलापूर : एफआरपीची थकीत रक्कम व ऊस दर जाहीर न करताच सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी गाळप करण्यास सुरूवात केली आहे़ यासंदर्भात शासनाचा व साखर कारखानदारांचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सोलापूर शहरातील पार्क चौकातील चार पुतळयासमोर खर्डा भाकर खाऊन असंतोष व्यक्त केला़ दिवाळीत गोड धोड खाण्याऐवजी खर्डा भाकरी खाण्याची वेळ कारखानदारांमुळे आली असा संताप यावेळी शेतकºयांनी व्यक्त केला.
सोलापूर जिल्ह्यातील ९ साखर कारखान्यांनी अद्याप ५९ कोटी रूपये एवढी एफआरपीची रक्कम शेतकºयांना दिलेली नाही. यामुळे शेतकºयांना दिवाळी साजरी करणे कठीण झाले आहे. शासनाचा व साखर कारखानदारांचा निषेध म्हणून आज खर्डा भाकरी खाऊन हे आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महामुद पटेल यांनी दिली. चालू गळीत हंगामासाठी साखर कारखानदारांनी एफआरपी अधिक २०० रूपये अधिक दर जाहीर करावा अशी शेतकरी संघटनेची मागणी आहे़ मात्र काही साखर कारखानदारांनी गाळप सुरू केला आहे. येत्या दोन दिवसात एफआरपी अधिक २०० रूपये दर जाहीर न केल्यास रस्त्यांवर उतरून आंदोलन करू, असा इशाराही महामुद पटेल यांनी दिला.
यावेळी आबा साठे, विजय रणदिवे, उमाशंकर पाटील, राजेंद्र लांडे, नरेंद्र पाटील, हमीद पटेल, अब्दुल रजाक मकानदार, राजु घोडके, गजानन घोडके, विजय भालेराव, महेश पैलवान, विलास धोंगडे, वजीर जमादार आदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.