ग्रामीण बेरोजगारीवर कमी गुंतवणुकीत उपजीविकेसाठी महत्त्वाचा मानला जाणारा पशुपालन व्यवसाय ग्रामीण भागातील अर्थकारणाचा केंद्रबिंदू मानला जातो; मात्र या व्यवसायाला मोठी घरघर लागल्याचे दिसत आहे. जनावरांचा चारा व पशुखाद्याच्या किमती गगनाला भिडत असतानाच दूध दराची घसरण कायम होताना दिसत आहे. या व्यवसायातील ही स्थिती बळीराजाला दिवसेंदिवस नुकसानीचा सामना करणारी ठरत आहे. याकडे प्रशासकीय स्तरावर सकारात्मक दृष्टीने निर्णय घेणे आवश्यक आहे; अन्यथा या शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून बळीराजाचा बळी जाणार आहे.
दूध उत्पादकांसाठी दुष्काळात तेरावा
तालुक्यात दूध उत्पादनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. दुधाच्या इतर उत्पादनामुळे या व्यवसायातील संधी समजून मोठी गुंतवणूक करीत व्यवसायाला सुरुवात केली आहे; मात्र चारा व पशुखाद्याचे दर वाढल्यामुळे खर्च वाढला आहे. दुधाचे दर ढासळत असल्यामुळे नुकसान होताना दिसत आहे. खरेदी व विक्री यातील तफावत मोठी असून, प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे दूध उत्पादकांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. कोरोना महामारीमुळे कृषी क्षेत्राचे मोठे नुकसान होत असतानाच शेतीपूरक व्यवसायाची झालेली हालत म्हणजे दुष्काळात तेरावा महिना अशी स्थिती सध्या बळीराजाची झाली असल्याचे खडूस येथील शेतकरी भीमराव ठवरे यांनी सांगितले.