बाळकृष्ण दोड्डी,सोलापूर : काेविड नंतर पहिल्यांदाच सोलापुरात जनावरांचा बाजार भरविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली असून बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे याबाबत आदेश काढणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी लोकमतला दिली.
जानेवारीत सोलापुरात श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा भरते. या काळात विजापूर रस्त्यावर जनावरांचा बाजार भरतो. यास अनेकांची वर्षांची परंपरा आहे. कोविड काळात प्रशासनाने जनावरांचा बाजार भरविण्यास बंदी घातली होती. कोविड कमी झाल्यानंतर मागच्या वर्षी लम्पी आजाराचा प्रार्दुभाव झाला. त्यामुळे, मागच्या वर्षी देखील बाजार भरविण्यास प्रशासनाने परवानगी दिली नाही.
यंदा लम्पी आजार ओसरली असून जनावरांचा बाजार भरवण्यास काही अडचण नसल्याचा अहवाल पशू वैद्यकीय विभागाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे सादर केला. त्यामुळे, यंदा बाजार भरवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. बुधवारी सायंकाळी याबाबत आदेश निघणार आहे.