पुणे/सोलापूर - सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षपदी मंगळवेढा येथील नगरसेविका अनिता नागणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँगेसला पक्षतील जेष्ठ नेत्यांकडून मोठा दगाफटका बसला आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते पक्षाला रामराम करुन पक्षातून दुसऱ्या पक्षात गेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचमध्ये नवीन नेतृत्वाला संधी देण्यात येत आहे. आमदार दिलीप सोपल यांच्या शिवसेना प्रवेशानंतर राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष मंदाताई काळे यांच्याजागी मंगळवेढ्याच्या अनिता नागणे यांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी पिछेहाट झाली आहे. माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर, आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करत, शिवबंधन बांधले. त्यामुळे, सोपल यांचे समर्थकही शिवसेना पक्षात सहभागी झाले. सोपल यांच्या शब्दावरुन राष्ट्रवादी जिल्हा महिला अध्यक्षपदाची जबाबदारी बार्शीच्या मंदाताई काळे यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र, सोपल यांच्या शिवसेना प्रवेशानंतर पक्षाकडून महिला उपाध्यक्ष अनिता नागणे यांच्याकडे जिल्हा महिला अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पुण्यातील बारामती प्रतिष्ठान, येथे राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला प्रदेशाध्यक्ष फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्ष रुपालाताई चाकणकर, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार अजित पवार यांच्या उपस्थितीत अनिता नागणे यांना जिल्हाध्यक्ष निवडीचे पत्र देण्यात आले.
जिल्हाध्यपदी निवड झाल्यानंतर अनिता नागणे यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे आभार मानले. तसेच, राष्ट्रवादीच्या पडत्या काळात माझ्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे ही मोठी संधी असल्याचं मी समजते. महिलांवरील अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणार असून महिला सक्षमीकरणाची चळवळ जिल्ह्यात अधिक गतिमान करणार असल्याचे अनिता नागणे यांनी लोकमतशी बोलताना म्हटले. जिल्ह्यातील महाविद्यालयीन तरुणींना राष्ट्रवादी महिला पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी एकत्रित करणार असून तरुणाईच्या माध्यमातून पीडित व शोषित महिलांना बळ देण्याचं काम जिल्ह्यात करायचं आहे. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला तो मी सार्थकी लावेल आणि महिला राष्ट्रवादीला जिल्ह्यात प्रभावी बनवेल, असेही अनिता यांनी म्हटले.