लक्ष्मण कांबळे
लऊळ : माढा तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांसाठी महाशिवरात्रीच्या सुट्टीच्या दिवशी झालेला किशोरी मेळावा आरोप-प्रत्यारोपात सापडला आहे. सुट्टीचा दिवस असला तरी कार्यक्रमाला या, अन्यथा एक दिवसाचा पगार कापला जाईल, अशी तंबी दिल्याने नाईलाजाने सर्वांनी उपस्थिती लावल्याची बाब आता अंगणवाडी सेविकांकडूनच पुढे यायला लागली आहे. यामुळे अधिकाºयांना पुन्हा एकदा अंगणवाडी सेविकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार, असे दिसत आहे.
शासनस्तरावरून निधीची तरतूद होताच बालविकास प्रकल्प अधिकारी सुधीर ढाकणे यांनी ऐन महाशिवरात्रीच्या प्रशासकीय सुट्टीच्या दिवशीच किशोरी मेळावा घेतला. सुट्टी दिवशी मेळावा घेण्याला काही सेविकांचा विरोध होता, मात्र ढाकणे यांनी पर्यवेक्षिकांमार्फ त अंगणवाडी सेविका व मदतनिसांवर दबाव टाकला. कार्यक्रमाला या नाही तर एका महिन्याचा पगार कापला जाईल, असा इशारा तोंडी आणि व्हॉट्सअॅप ग्रुपवर दिला. त्यामुळे नाईलाजाने सगळ्याच अंगणवाडीतार्इंना हजर राहावे लागले, असे आता अनेक ताई सांगायला लागल्या आहेत.
शासनामार्फत प्रत्येक तालुका स्तरावर घेतल्या जाणाºया किशोरी मेळाव्यासाठी निधीची तरतूद झाली आहे. कोणत्याही दिवशी आचारसंहिता लागू शकते, त्यामुळे तातडीने कार्यक्रम उरका, निधी खर्च करा, अशा वरिष्ठांच्या सूचना आहेत. त्यामुळे अधिकारीही आता शासकीय सुट्ट्या आणि कर्मचाºयांच्या मानसिकतेचा विचार न करता कार्यक्रम उरकण्याच्या कामी लागले आहेत.
मात्र या मेळाव्यावर अनेक अंगणवाडी सेविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महाशिवरात्री हा महिलांबरोबरच सर्वांसाठीच महत्त्वाचा सण असतानाही बालविकास प्रकल्प अधिकाºयांच्या दबावापोटी कार्यक्रमाला हजरराहावे लागल्याचे या सेविका सांगत आहेत. त्यामुळे महिलांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाला अनेक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य गैरहजर होते. त्यामुळे शासकीय आयोजनाचे हे बंधन फक्त कर्मचाºयांपुरतेच का, असा प्रश्नही आता विचारला जात आहे.
विलंब आणि भोवळ- सकाळी ९:३० वाजता मेळावा सुरू होणार होता. त्यामुळे उपवासाच्या दिवशी तालुक्यातील ग्रामीण भागातील सेविका सकाळीच घरून निघाल्या. मात्र सकाळचा मेळावा दुपारी १ वाजता सुरू झाला. घरून उपाशीपोटी आलेल्या महिला दुपारपर्यंत उद्घाटनाची वाट बघत होत्या. काहींना तर उपाशी असल्याने भोवळ आली होती. परंतु अधिकाºयांनी मनावर घेतले नाही, असा अंगणवाडी सेविकांचा आरोप आहे.
जिल्हा कार्यालयाचे आदेश व परिपत्रक असेल तर किशोरी मेळावा सुट्टीच्या दिवशी घेता येतो. बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या किशोरी मेळाव्याचे मला निमंत्रण होते. परंतु वैयक्तिक कामामुळे मी बाहेरगावी असल्याने तेथे काय झाले, याबाबत अधिक सांगता येणार नाही.- गोकुळदास बैरागी, गटविकास अधिकारी, माढा
पंचायत समितीच्या बालविकास विभागाच्या किशोरी मेळाव्याला महाशिवरात्रीच्या सुट्टीचा मुहूर्त कसा मिळाला हे कळाले नाही. ढाकणे यांच्या आडमुठ्या धोरणांचा फटका महिलांना बसला आहे. उद्घाटन पाच तास विलंबाने झाले, उपाशीपोटी बसलेल्या काही महिलांना चक्कर आल्याचे कळले. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे कळविले जाईल.- चंद्रकांत वाघमारे, जिल्हा कार्याध्यक्ष, आरपीआय
वरिष्ठ पातळीवरील सूचना व आदेशावरूनच संबंधित मेळावा आयोजित केला होता. महाशिवरात्री असल्याने फराळाची व्यवस्था होती. वरिष्ठ पदाधिकारी उिशिराने आल्याने कार्यक्रम सुरू होण्यास थोडा विलंब झाला. आचारसंहिता कधी लागेल हे सांगता येत नसल्याने या कार्यक्रमाचे आयोजन लवकर केले होते.- सुधीर ढाकणे, बाल विकास प्रकल्प अधिकारी, माढा