सुजल पाटील
सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा भंग करणाºयांवर आता कारवाई करून दंड वसूल करण्याचे अधिकार तलाठी म्हणजेच भाऊसाहेबांना देण्यात आले आहेत. एकेकाळी आण्णासाहेब म्हणजे पोलिसांकडून होणारी कारवाई आता गाव कामगार तलाठी हे ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, सरपंच, तंटामुक्त अध्यक्ष यांच्या मदतीने करून दंड वसूल करीत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात पसरलेल्या कोरोनाने आता ग्रामीण भागातही जोरात पाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशानुसार विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ग्रामीण भागात सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे, दुचाकीवरून दोघांनी प्रवास करणे, फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखूचे सेवन करणे आदी लोकांवर कारवाई करण्याचे आदेश प्राप्त झाले. त्यानंतर गावातील तलाठ्यांनी इतरांच्या मदतीने कारवाई करण्यास सुरुवात केली.
तलाठी व ग्रामसेवक हे गावातील मध्यवर्ती ठिकाण, गावाच्या हद्दीवर उभा राहून कारवाई करण्यात येत आहे. काही चलाखांनी या कारवाईपासून सुटका करून घेण्यासाठी गावात असलेल्या गल्लीबोळातील रस्त्यांचा उपयोग करीत असल्याचे दिसत आहे़
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महसूलचे प्रयत्नग्रामीण भागात पसरत चाललेल्या कोरोना या संसर्गजन्य आजाराची साखळी तोडण्यासाठी महसूल प्रशासनाने कंबर कसली आहे. तलाठी, आरोग्य केंद्रातील कर्मचारी, पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आदींच्या मदतीने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वच विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. शिवाय परगावाहून आलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्याचेही काम महसूल यंत्रणेमार्फत सुरू आहे.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशानुसार ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा भंग करणाºयांवर कारवाई करण्यात येत आहे. वाघोली (ता. मोहोळ) गावात मास्क न वापरणे, सार्वजनिक ठिकाणी घोळका करून बसणे, दुकानात आवश्यक त्या उपाययोजना न केल्यामुळे कारवाई करून दंड वसूल केला आहे.
- गीतांजली जाधव,तलाठी, वाघोली, ता. मोहोळ