वैराग : वैराग ग्रामपंचायतीची अनेक दिवसांपासूनची प्रलंबित असलेली नगरपंचायतीची मागणी मंगळवारी पूर्ण झाली आहे. तसा आदेश संबंधित विभागाचे उपसचिव सतीश मोघे यांनी काढला आहे. या आदेशाची प्रत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील माजी सरपंच निरंजन भुमकर यांना पाठविली.
वैराग ग्रामपंचायतीची नगरपंचायत करावी अशी मागणी सर्वच पक्षांनी केली होती. २४ डिसेंबर २०२० रोजी याबाबतची उद्घोषणा झाली होती. दरम्यान, तीन महिन्यांपूर्वी येथील ग्रामपंचायतीची निवडणूक लागली होती. मात्र सर्व नागरिकांनी एकी दाखवत कोणीही निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला नव्हता. त्यामुळे आपोआपच निवडणूक प्रक्रिया रद्द होऊन निवडणूक सहा महिन्यांसाठी पुढे ढकलली होती. ती लागण्यापूर्वी सदर आदेश निघणे गरजेचे होते.
या घोषणेनंतर वैराग शहरवासीयांनी फटाक्यांची आतषबाजी करीत आनंद व्यक्त केला. उद्घोषणेनंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मागवलेल्या आक्षेपांचा विचार करून वैराग ग्रामपंचायतीची " वैराग नगरपंचायत " या नावाने नगरपंचायत गठित करण्यात येत असल्याचा आदेश उपसचिव सतीश मोघे यांनी काढला आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांची नेमणूक होईपर्यंत पुढील कामकाज तहसीलदार यांनी पाहावे, असेही आदेशात नमूद केले आहे.