सोलापूर : मार्च २०१९ मध्ये मुदत संपणाºया तसेच नव्याने स्थापित झालेल्या राज्यातील २६४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. यात सोलापूर जिल्ह्यातील ५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुका संगणकीकृत राबविण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.
बार्शी तालुक्यातील दहिटणे, रुई, करमाळा तालुक्यातील भाळवणी, पंढरपूर तालुक्यातील बिटरगाव, मंगळवेढा तालुक्यातील माळेवाडी या पाच ग्रामपंचायतींची मुदत मार्च २0१९ पर्यंत संपत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.
या निवडणुकीसाठी २५ जानेवारी रोजी तहसीलदार यांच्याकडून नोटीस प्रसिद्ध करण्यात येईल. ४ ते ९ फेब्रुवारी दरम्यान ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी तहसील कार्यालयात अर्ज दाखल, तर ११ फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. १३ फेब्रुवारी रोजी उमेदवार अर्ज माघार घेण्याची शेवटची मुदत असून याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. २४ फेब्रुवारी रोजी मतदान तर २५ रोजी मतमोजणीचे आदेश दिले आहेत.