पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीचा राजा श्री.पांडुरंगाच्या चरणी दुधाचा अभिषेक घालून या राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला १० रुपये अनुदान द्यावे व दुध भुकटीला प्रति किलो ५० रुपये निर्यात अनुदान द्यावे या मागणीसाठी माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे नातू प्रणव परिचारक यांनी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह आंदोलन केले आहे.
राज्यामध्ये रोज १ कोटी २० लाख लिटर दुधाचे संकलन होत आहे. ६० लाख लिटर दूध पिशवी बंद मध्ये विक्री होत आहे. ५० लाख लिटर दुध अतिरिक्त असून त्याची दूध भुकटी तयार केली जात आहे. सध्या गाईच्या दुधाला २० रुपये लिटर भाव आहे. तरी मागील देवेंद्रजी फडणवीस सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना ५ रुपये थेट अनुदान दिले होते व भुकटीला ५० रुपये निर्यात अनुदान दिले होते. याच धर्तीवर या सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला १० रुपये अनुदान द्यावे व दूध भुकटीला प्रति किलो ५० रुपये निर्यात अनुदान द्यावे अशी मागणी केली. परदेशातून भुकटी आयात केलेली नाही परंतु या सरकार मधील काही लोक जाणीव पूर्वक कांगावा करत आहेत त्यांनी आधी शेतकऱ्यांना न्याय द्यावा असे आमदार सदाभाऊ खोत म्हणाले. खोत यांच्यासह प्रणव परिचारक ही उपस्थित होते.
यावेळी रयत क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक भोसले, बळीराजा शेतकरी संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर, नितीन करंडे, दत्तात्रय मस्के व कार्यकर्ते उपस्थित होते.