सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप (ता. द. सोलापूर) गावात सलग दुसºया दिवशी आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे़ गुरुवारी सकाळी सोलापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेणाºया आणखी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तालुका आरोग्य विभागाने ब्राह्मणगल्ली सील केली आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ गायकवाड यांनी दिली.
मंद्रुप येथील ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकास त्रास होऊ लागल्याने सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यांना यापूर्वी त्रास होत असल्याने सोलापुरातील दुसºया दवाखान्यात अॅडमिट केले होते, उपचारानंतर बरे झाल्याने रविवारी ते घरी परतले होते. सोमवारी पुन्हा त्रास सुरू झाल्यावर सोलापुरातील दुसºया एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्यांना लक्षणे आढळल्याने चाचणी घेण्यात आली.
बुधवारी सायंकाळी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने गुरुवारी सकाळीच आरोग्य विभागाचे पथक मंद्रूपमध्ये दाखल झाले व त्यांनी ब्राह्मणगल्लीचा परिसर सील करून संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे मंद्रूप मध्ये बुधवारी हरळय्यानगर परिसरात एक रुग्ण आढळला होता. त्या रुग्णाच्या संपर्काच्या अनुषंगाने गावातील तीन खाजगी डॉक्टर व एक सराफ असे चार जण तपासणीसाठी आरोग्य विभागाने ताब्यात घेतले आहेत. गावात कोरोना पॉझिटिव रुग्ण आढळल्यामुळे जनता कर्फ्यू जारी करण्यात आला असून रस्त्यावर फक्त पोलिस आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी फिरताना दिसत आहेत.