शीतलकुमार कांबळे, सोलापूर: मुंबई येथील अरबी समुद्रात रात्रीच्या काळोख्या अंधारात न थांबता धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया हे ३९ किलोमीटरचे अंतर कीर्ती भराडियाने (वय १७) पार केले. २१ फेब्रुवारी रोजी न थांबता ७ तास ५४ मिनिटात पोहून अंतर कापत तीने आणखी एक विक्रम केला. मंगळवार, २१ फेब्रुवारी रोजी धरमतर जेट्टी येथून पहाटे २ वाजून २० मिनिटाने पोहण्यास सुरुवात केली होती. सकाळी १० वाजून १४ मिनिटाला गेट वे ऑफ इंडिया येथे पोहोचली. किर्तीने सुरुवातीचे २८ किलोमीटर अंतर ४ तासात पूर्ण केले होते. परंतु, पाण्याच्या उलट प्रवाहामुळे उर्वरित ११ किलोमीटर पार करण्यास ३ तास ५४ मिनिटांचा वेळ लागला.
किर्तीच्या संरक्षणासाठी दोन बोटी तिच्यासोबत होत्या. त्यामध्ये द्वारकादास भराडिया, वडील नंदकिशोर भराडिया, आई चित्रा भराडिया, आदित्य, अभिजित, अविनाश, श्रेया, विवेक, प्रशिक्षक शेटे, आंतरराष्ट्रीय जलतरणपटू रुपाली रेपाळे, स्वीमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सुबोध सुळे, नीरज काटकूर हे पूर्णवेळ उपस्थित होते. श्रीलंका ते भारत (रामेश्वरम) पर्यंत न थांबता पोहणे हे किर्तीचे पुढील ध्येय आहे.
अंधारातही धाडसाने कापले अंतर
रात्रीच्या अंधारात समुद्रात पोहणे ही बाब साधारण नसून याकरिता प्रचंड धाडसाची आवश्यकता असते. कीर्तीने जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने हे धाडस दाखविले आणि यशस्वीरीत्या पूर्ण केले. या काळात कीर्तीने रात्रीचा काळोख अंधार,पाण्याचा उलट प्रवाह,खारे अस्वच्छ पाणी,ऑईल मिश्रित पाणी, मासे अशा अनेक अडचणींचा सामना करत अंतर न थांबता पोहून पूर्ण केले.