सोलापूर : सध्या सोलापूर ते तिरुपती जाण्यासाठी रोज एक रेल्वे गाडी असून आता यात आणखी एका विशेष गाडीची भर पडणार आहे. सोलापूर ते तिरुपतीसाठी नवीन विशेष गाडी (०१४३७-०१४३८) १५ डिसेंबर पासून सुरु होणार आहे. रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी गाडी सोलापूर स्थानकावरुन सुटेल. दुसऱ्या दिवसी सायंकाळी ७.४५ वाजता तिरुपतीला पोहोचेल. या गाडीचा प्रवास लांबचा असून प्रवाशांकडून कमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून रेल्वे प्रशासन ही गाडी नियमित करणार आहे. अन्यथा गाडीचे नियोजन रद्द होवू शकते.
सोलापूर मार्गे कुर्डूवाडी व्हाया उस्मानाबाद, लातूर, उदगीर, बाल्की, बीदर, जतरोड, कलबुर्गी, वाडी मार्गे रायचूर तेथून थेट तिरुपतीला पोहोचणार आहे. साधारण बावीस तासांचा प्रवास असणार आहे. सोलापूर, उस्मानाबाद तसेच कलबुर्गी परिसरातून मोठ्या संख्येने भाविक तिरुपतीला जातात. तिरुपतीला जाणाऱ्या दैनंदिन सर्वच गाड्या हाऊसफूल्ल आहेत. याची दखल घेवून रेल्वे प्रशासन नवीन गाडी सुरु करणार आहे.
यासोबत सोलापूर नागपूर सोलापूर ही नवीन साप्ताहिक गाडी (०१४३३-०१४३४) देखील सुरु होणार आहे. रविवार, ११ डिसेंबर सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी ही गाडी सोलापूर रेल्वे स्थानकावरुन नागपूरकडे रवाना होईल. ही गाडी दुसऱ्या दिवसी म्हणजे सोमवार, १२ डिसेंबर रोजी वाजून १ वाजून ५ मिनिटांनी नागपूरला पोहोचेल. तेथून पुन्हा हीच गाडी दुपारी सव्वा तीन वाजता सुटेल. मंगळवारी सायंकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी ही गाडी सोलापुरात पोहोचेल. ही गाडी वीस डब्यांची आहे.